प्रतिनिधी,कोल्हापूर
Ganesh Utsav Kolhapur : श्रावण मासाच्या प्रारंभापासून ज्याच्या आगमनाची आतुरता लागते त्या सुखकर्ता,विद्येचा अधिष्ठाता आणि विघ्नहर्ता बाप्पांचे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंगळवारी 19 रोजी आगमन होत आहे.त्याच्या स्वागतासाठी अवघ्या करवीरनगरीतील घरदार आणि सार्वजनिक मंडळे सर्व तयारीनिशी सज्ज झाली आहेत.घरोघरी गणरायाच्या प्रतिष्ठापनेभोवतीने केल्या जात असलेल्या आराशीचे काम तर जोरात सुरू आहे.घरातील बच्चे कंपनीसह सर्वच मंडळी आरास करण्यात गुंतली आहेत.आराशी सप्तरंगी विद्युत रोषणाईने वेगळा लुकही आणला आहे.अनेक कुटुंबात घराच्या दर्शनीपासून ते अगदी बाप्पांच्या प्रतिष्ठापनेपर्यंतच्या सर्व जागेला सजवले आहे.त्यामुळे घराचा कोना आणि कोना चैतन्याने भाऊन गेला आहे. अशा सगळ्या वातावरणात पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार अनेक घरांमध्ये गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणेशाचे आगमन होत आहे.
दरम्यान, गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी कुटुंबातील कर्ती मंडळी सहकुटुंब-सहपरिवार सोमवारी शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये दाखल होतील.त्यांच्याकडून गणेश आगमनाच्या काढल्या जाणाऱ्या मिरवणूकीतून चार पैशांची कमाई करण्यासाठी कोल्हापूर जिह्यासह सांगली,सातारा, सोलापूर येथील अनेक पारंपरिक वाद्येही कुंभार गल्ल्यांमध्ये दाखल होतील. दुपारनंतर शहरात घरगुती गणेश आगमनाच्या मिरवणूकींना सुऊवात होईल.याच मिरवणुकींचा माहोलात अनेक मंडळांकडून काढल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीच्या मिरवणूकाही मिसळून जातील.
गणेश आगमन आणि मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच कुंभार गल्ल्यासह तिकटी, चौक, बाजारपेठांसह उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक विक्रेत्यांनी श्रीफळ, उदबत्ती, फाया, वस्त्र, मोरया लिहिलेल्या रिबन,भगवे ध्वज, पितांबर, सुगंधी अष्टगंध, उर्पण आदी साहित्य विक्रीचे स्टॉल उभारले आहेत. मंगळवारी सकाळी घरोघरी गणेशाच्या स्वागताच्या तयारीची धांदल उडणार आहे. सकाळी घरगुती आणि दुपारीनंतर सुऊ होणाऱ्या सार्वजनिक मंडळांच्या गणेश आगमन मिरवणूकीला शहरात माहोल तयार होऊन खऱ्या अर्थाने गणेशपर्वाला सुऊवात होईल.









