प्रतिनिधी,कोल्हापूर
शहरातील बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे.ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केलेले रस्ते,अमृत योजनेची रखडलेली कामे यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.यामुळे गणपती बाप्पांचे आगमन खड्डे आणि धुळीतूनच होत आहे.
कोल्हापूर महापालिकेतील संबंधित अभियंता, वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून शहरातील रस्ते करताना दुर्लक्ष केले जात आहे.यामुळेच ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे रस्ते होत आहेत. परिणामी वॉरंटीमध्येच रस्त्यावर खड्डे पडत आहेत.शहरामध्ये ठराविकच रस्ते दर्जदार आहेत.यामध्ये नगरोत्थान योजनेतील 108 कोटींमध्ये झालेले काही रस्ते तसेच आयआरबी कंपनीने केलेले 49.99 किलोमीटरचे रस्त्याचा समावेश आहे.उर्वरीत रस्त्यापैकी बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे.यामध्ये भरीत भर अमृत योजनेची रखडलेली कामे आहे. संबंधित ठेकेदाराने पाईपलाईन टाकल्यानंतर खुदाई केलेल्या परिसराचे पॅचवर्क केलेले नाही.यामुळे शहरातील काही रस्त्यांवर खड्ड्यांचे आणि धुळीचे साम्राज्य झाले आहे.काही रस्त्यांवर टाकलेला मुरूम पावसात वाहून गेला आहे.मुख्य रस्त्यासोबत गल्लीबोळातील रस्त्याची अक्षरश:चाळण झाली आहे. शहरातील काही गल्लीमध्ये पाच वर्षात रस्तेच झालेले नाहीत,अशी स्थिती आहे.कोल्हापूरकरांनी ‘बाप्पां’च्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.परंतू खराब रस्ते, धुळीमधूनच बाप्पांचे आगमन होणार आहे. काही मंडळांनी गेल्या दोन दिवसांपासून गणेशमूर्ती आणल्या आहेत.त्यांना या खराब रस्त्यांचा अनुभव आला आहे.
पाण्याचा खजिना येथील रस्त्याची लागली ‘वाट’
अमृत योजनेतून पाण्याचा खजिना ते कोळेकर तिकटी येथे पिण्याची पाईपलाईन टाकण्यात आली.मात्र,या कामास विलंब झाला.दरम्यान,पावसाचे आगमन झाले.यामुळे मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली.पावसामध्ये टाकलेला मुरूमही वाहून गेला.उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावेळी येथे खड्डे टाकण्यात आली.मात्र,धुळीचे साम्राज्य झाले आहे.‘कुठल्या मुहूर्तवर पाईपलाईन टाकली’अशी म्हणण्याची वेळ येथील नागरीकांवर आली आहे.
मंडळाच्या मंडपासमोरच खड्डे
काही मंडळाच्या मंडपासमोरच खड्डे आहेत.यामध्ये संभाजीनगर, खरी कॉर्नर येथील मंडळाचा समावेश आहे.वास्तविक गेल्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे.महापालिकेने डांबरी पॅचवर्क करून रस्त्यांची डागडुजी करणे अपेक्षित होते.परंतू मनपाने केवळ सार्वजानिक गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरच पॅचवर्क केले.
डांबरी प्रकल्पाला मुहूर्त मिळेना
शहरातील खराब झालेले रस्ते यापूर्वी महापालिकेचे सार्वजानिक बांधकाम विभागाकडून केले जात होते.मात्र,गेल्या काही वर्षापासून लाईन बाजार येथील मनपाचा डांबरी प्रकल्प बंद आहे.तसेच सार्वजानिक बांधकाम विभागातील कर्मचारी इतर विभागात बदली झाली आहेत.त्यामुळे मनपाकडून पॅचवर्कही ठेकेदारामार्फत करून घेण्याची वेळ आली आहे.
टक्केवारीची किड
महापालिकेच्या रस्ते कामात टक्केवारीची किड लागली आहे.शिपाईपासून ते वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मलई खाण्याची सवय लागली आहे.मंजूर निधी पैकी 40 ते 50 टक्के रक्कम वाटूनच संपते.अशा स्थितीमध्ये रस्ते दर्जदार होणार कसे असाही प्रश्न आहे.