पक्षी-जनावरांचा वाढता वावर, कचरा न फेकण्याच्या सूचना
बेळगाव : सांबरा येथील विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचा प्रकार घडत आहे. यामुळे पक्षी व जनावरांचा या परिसरात वावर वाढला आहे. विमान उड्डाण करताना अथवा उतरताना पक्षी व प्राण्यांचा धोका संभवतो. त्यामुळे विमानतळ प्रशासनाकडून आसपासच्या ग्राम पंचायतींच्या कर्मचाऱ्यांना कचरा टाकू नये अशा सूचना केल्या आहेत. बेळगाव विमानतळ शेजारीच सांबरा, निलजी, होनिहाळ या गावांच्या सीमा आहेत. या गावांमधील कचरा विमानतळाच्या शेजारी खुल्या जागांमध्ये फेकला जातो. परंतु, यामुळे भटके प्राणी व पक्ष्यांचा वावर वाढला आहे. विमान उड्डाण करताना तसेच उतरताना पक्ष्यांचा अडथळा ठरू शकतो. अनेकवेळा पक्ष्यांमुळे विमान उतरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पक्ष्यांचा वावर धोकादायक ठरत असून, परिसरात कचराच टाकला जाणार नाही, यासाठी विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच पाहणी केली.
कचरा टाकण्यावर प्रतिबंध करण्याचा निर्णय
ग्राम पंचायत पीडीओ, अध्यक्ष यांच्यासह विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो, अशा जागांची पाहणी केली. कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढला असून एखाद्या वेळेस भटके जनावर मुख्य धावपट्टीवर आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे कचरा टाकण्यावर प्रतिबंध करण्याचा निर्णय या सर्वेक्षणातून घेण्यात आला.
कचरा टाकण्यास प्रतिबंध करणार
विमानतळ शेजारील खुल्या जागांमध्ये कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे पक्षी व भटक्या जनावरांचा वावर वाढला आहे. पक्ष्यांमुळे विमानांची ये-जा करताना धोका निर्माण होतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, अशा ठिकाणी प्रतिबंध करण्याचा विचार सुरू आहे.
त्यागराजन (संचालक, बेळगाव विमानतळ)









