शैक्षणिक संदेश, बळीराजाची व्यथा मांडणाऱ्या देखाव्यांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची भर
वार्ताहर /किणये
लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता केवळ अवघा एक दिवस राहिलेला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अवघा तालुका सज्ज झाला आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. ग्रामीण भागातील मूर्तिकार गणरायांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. श्रावण महिना संपल्यानंतर साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहते ती लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. यंदा तालुक्यात म्हणावा तसा दमदार पाऊस झाला नाही. यंदा बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अशी परिस्थिती असतानाही विविध गावांमध्ये असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून मंडपाची डेकोरेशन सजावट सुरू करण्यात आलेली आहे.
ग्रामीण संस्कृतीचे दर्शन
ग्रामीण भागात काही ठिकाणी हलते देखावे साजरे करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक संदेश देणारे तसेच बळीराजाची व्यथा मांडणारे देखावे सादर करण्यात आलेले आहेत. तर काही ठिकाणी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या देखाव्यांचे कामकाजही सुरू आहे. ग्रामीण भागातील काही मूर्तिकारांनी कोल्हापूर व अन्य भागातून गणेशमुर्त्या आणलेल्या आहेत. तर बरेच मूर्तिकार स्वत: मुर्त्या बनवलेल्या आहेत. या मुर्त्यांना गेल्या पंधरा दिवसापासून रंगकाम करण्यात आलेले आहे. मूर्तिकार आता गणेशोत्सवला एक दिवस शिल्लक राहिला असल्यामुळे अखेरचा हात फिरवतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.
शाडुच्या मूर्तींना पसंती
घरगुती लहान मूर्ती 300 रुपये, 500 रु., 1000 रु., 2000रु. पासून साडेतीन हजार रुपयेपर्यंत ते पाच हजार रुपयेपर्यंत बनविण्यात आलेल्या आहेत. पिरनवाडी, बहाद्दरवाडी, बेळगुंदी, मच्छे, कर्ले, बेळवट्टी, राकसकोप आदी ठिकाणच्या काही मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती बनवलेल्या आहेत. या शाडूच्या मुर्त्यांना भक्तांनी अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे शाडूने बनविलेल्या गणेशमूर्तीची अॅडव्हान्स बुकिंग आधीच करण्यात आलेली आहे, अशी माहिती काही मूर्तिकारांनी दिली आहे.
मूर्तिकार कामात मग्न
गणपती बाप्पाची मूर्ती अधिकाधिक आकर्षक दिसण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून मूर्तिकार डोळ्यात तेल घालून रंगकाम करताना दिसत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या पंधरा दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपांचा मुहूर्तमेढ कार्यक्रम केलेला आहे. विविध प्रकारचे आकर्षक पडदे तसेच बाजारात मिळालेले विविध प्रकारचे फुलांचे डेकोरेशन करण्यात आलेले आहेत. बऱ्याच भक्तांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवासाठी विविध प्रकारचे देखावे बनवलेले आहेत. हे देखावे करण्यासाठीही बरेच तरुण कार्यकर्ते धडपडू लागले आहेत. एकूणच साऱ्यांनाच या उत्सवाची चाहूल लागली असून शनिवार व रविवार हे दोन दिवस कामगार वर्गाला सुटी असल्यामुळे सर्व कामगारांनी गणेश सोबत बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसाठी शनिवार व रविवार अशी दोन दिवस मेहनत घेतलेली आहे. मंगळवारी गणेशोत्सव असल्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत सजावटीचे कामकाज सुरू होते. बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक अगदी जल्लोषात काढण्याची तयारी सुरू आहे.









