मध्यप्रदेशात तलाव फुटल्याने गावात पूर, 9 घरे कोसळली
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशात सध्या विविध भागात पाऊस सुरू असून ठिकठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडत आहेत. झाबुआ जिल्ह्यात तलाव फुटल्याने 9 घरे कोसळली. पुराच्या पाण्यात एकाच कुटुंबातील सात जणांसह अन्य एका घरातील एक वृद्ध महिला वाहून गेली. सायंकाळपर्यंत तीन मृतदेह सापडले होते. या आपत्तीमुळे पीडित कुटुंबांना निवारागृहात ठेवण्यात आले आहे. तसेच एसडीआरएफची टीम आणि पोलिसांची पथके पाण्यात वाहून गेलेल्या लोकांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. तसेच प्रशासकीय अधिकारी गावात तळ ठोकून आहेत.
झाबुआ जिह्यातील थडनला तालुक्यातील बहादूर पाडा पंचायतीच्या पडधामंदर गावात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे गावातील तलाव भरून तुडुंब झाल्यानंतर त्यातून गळती सुरू झाली होती. तलावाच्या बांधाला तडे दिसू लागल्यानंतर गावातील सखल भागातील घरे रिकामी करण्यात आली. परंतु, एका कुटुंबाने घर सोडण्यास विलंब केल्याने त्यातील सर्व लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. शनिवारी रात्री तलाव फुटल्यामुळे पाणी वेगाने गावात शिरल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. गावातील सखल भागात असलेली 9 घरे कोसळली. त्याचवेळी पुराच्या पाण्यात एकाच कुटुंबातील सात जण आणि शेजारील कुटुंबातील एक वृद्ध महिला वाहून गेली.









