गणेश उत्सव समितीचे पद्माकर कापसे यांची माहिती; गणेशमूर्तीचे आज आगमन, उत्सव काळात विविध उपक्रम
कोल्हापूर प्रतिनिधी
तब्बल 139 वर्षाचा वारसा घेऊन जनमाणसात वेगळा ठसा उमटवलेले दिलबहार तालीम मंडळ यंदाचा गणेशोत्सव शिवशक्ती व शक्तीस्थानांचे दर्शन घडवणारी अलौकीत संकल्पना घेऊन साजरा करणार आहे. त्यासाठी तालीम परिसरात 80 फुट लांब, 40 फुट ऊंद आणि 25 फुट उंच अशा आकाराचा गणेश मंडप उभारला जात आहे. तो पूर्ण वॉटरप्रुफ असणार आहे. या मंडपात विराजमान दख्खनचा राजा नामक गणेशमूर्तीसोबत नाशिक, उत्तराखंड, अमरनाथ व जम्मु-काश्मीर येथील 4 शक्तीस्थानांचे दर्शन घडवले जाणार आहे, अशी माहिती तालमीच्या उत्सव समितीचे पद्माकर कापसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तालमीच्या दख्खन राजा नामक गणेशमूर्तीचे रविवार 17 रोजी सवाद्य मिरवणूकीने आगमन केले जाईल. बिंदू चौकातून दुपारी 4 वाजता मिरवणूक सुऊ होईल, असे सांगून शक्तीस्थानांबाबतची अधिक माहिती देताना कापसे म्हणाले की, गणेश मंडपात केदारनाथ व अमरनाथ ही दोन शिवस्थाने आणि सप्तश्रुंगी व वैष्णोदेवी ही दोन शक्तीस्थानांची मांडणी केली जाणार आहे. यामध्ये शिवशक्ती व शक्तीस्थानांच्या चार प्रतिकृती उभारल्या जाणार आहे. सर्वच प्रतिकृती 8 फुट उंच व 14 फुट ऊंदी इतक्या आकारात बनवण्यात येणार आहेत. शिवाय या प्रतिकृतींची निर्मिती थ्रीडी स्वऊपात असणार आहेत. प्रतिकृती पाहताना भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर हे तिर्थक्षेत्र का मानले जाते, अमरनाथाचे स्थान ईश्वरी निसर्गाचा विहंगम अविष्कार का आहे, याची अनुभूती येणार आहे.
उत्तरभारतातील पवित्रस्थानांपैकी एक स्थान म्हणजे वैष्णोदेवीचे स्थान. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 देवींच्या स्वयंभू लिंग स्वऊपात एका गुंफेमध्ये वैष्णोदेवीचे अस्तित्व आहे. या अस्तित्वाचे दर्शनही प्रतिकृतीतून घडवले जाणार आहे. तसेच नाशिकपासून 37 किलो मीटर अंतरावर असलेल्या वणी येथे सप्तश्रृंगीदेवीचे स्थान आहे. साडे तीन देवांच्या शक्तीपीठातील अर्धमात्रा असणारे स्थान म्हणून सप्तश्रृंगीदेवीला विशेष महत्व आहे. हे महत्व का आहे, हेही प्रतिकृतीतून अधोरेखित केले जाणार आहे.
पत्रकार परिषदेला उत्सव समितीचे अध्यक्ष जर्नादन पाटील, उपाध्यक्ष ओंकार खराडे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, अॅङ प्रसन्न मालेकर, प्रमोद बोडंगे आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवातील उपक्रम असे :
– 24 सप्टेंबरला सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत रक्तदान शिबिर
– गणेशोत्सव काळात नेत्र व अवयवदान संकल्प फॉर्म भरून घेणार
– वालावलकर हॉस्पीटलमध्ये मोफत नेत्र चिकित्सा शिबिर
– गणेशमूर्तीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना रोपांचे वाटप









