वृत्तसंस्था /बेलग्रेड
विश्व कुस्ती फेडरेशनच्या येथे सुरू झालेल्या विश्व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत शनिवारी पहिल्या भारताच्या चार मल्लांनी फ्रिस्टाईल प्रकारात आपल्या वजनगटामध्ये विजयी सलामी दिली. भारताचा मल्ल अभिमन्यूने युक्रेनच्या सातव्या मानांकित इहोर नेकीफोरुक याला पराभवाचा धक्का दिला. गेल्या जूनमध्ये झालेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱ्या अभिमन्यूने शनिवारी येथे 70 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या लढतीत युक्रेनच्या नेकीफोरुकचा 5-0 अशा गुणांनी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. या लढतीतील दुसऱ्या तीन मिनिटांच्या सत्रामध्ये 2.41 मिनिटांचा कालावधी झाला असताना पंचांनी ही लढत थांबवून अभिमन्यूला 5-0 असे विजयी म्हणून घोषित केले. आता अभिमन्यूची पुढील फेरीतील लढत माल्डोवाच्या ग्रेमेजशी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा आणखी एक मल्ल आकाश दाहियाने पहिल्या फेरीच्या लढतीत माल्डोवाच्या कोलेसिनीकचा 10-5 अशा गुणांनी पराभव करत विजयी सलामी दिली. आकाश दाहियाचा पुढील फेरीतील सामना उझ्बेकच्या ट्युरोबोव्हशी होणार आहे. 86 किलो वजन गटात झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या संदीप मानने नॉर्थ मॅसेडोनियाच्या डिजेन मिट्रोव्हचा 10-0 अशा एकतर्फी पराभव केला. 125 किलो वजनगटात भारताच्या सुमितने जपानच्या येमामोटोचा 3-1 अशा गुणांनी पराभव पुढील फेरी गाठली.









