वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतातील 14 लोकप्रिय वृत्त वाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांवर (अँकर्स) बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यानंतर आता काँग्रेसने हळूहळू या निर्णयापासून माघार घेण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. हे वृत्तनिवेदक आमच्यावर अन्याय करीत होते, म्हणून आम्ही बहिष्काराचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय स्थायी स्वरुपाचा नाही. या अँकर्सची वर्तणूक बदलल्यास तो मागे घेतला जाऊ शकतो, अशी सारवासारवी आता या पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केली आहे. आम्ही कोणावरही बहिष्कार टाकलेला नाही, कोणालाही काळ्या सूचीत टाकलेले नाही किंवा त्यांच्यावर बंदी घातलेली नाही. हे वृत्तनिवेदक आमच्याशी पक्षपाती भूमिकेने वागतात. याची जाणीव त्यांना करुन द्यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ही आमची असहकार्य चळवळ आहे. या वृत्तनिवेदकांनी आम्हाला समजून घेतल्यास आम्ही त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतो, अशी नवी भूमिका आता काँग्रेसने घेतल्याचे पवन खेडा यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे.
ते आमचे शत्रू नाहीत
हे वृत्तनिवेदक आमचे शत्रू नाहीत. आमचा निर्णयही स्थायी किंवा कायमचा नाही. ते जे करीत आहेत ते देशासाठी योग्य नाही, याची जाणीव त्यांना झाल्यास त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो. आता त्यांनी काय तो निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन खेडा यांनी केल्याने काँग्रेसची भूमिका मवाळ झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या सर्व जागा जिंकू : अमित शहा
पाटणा : आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सर्व 40 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. या राज्याच्या मधुबनी जिल्ह्यातील झांझरपूर येथील एका जाहीर सभेत त्यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्यातील सर्व चाळीस जागा जिंकण्याचा विक्रम करणार आहे. विरोधी पक्षांचे ऐक्य केवळ सत्तास्वार्थासाठी आहे. भारताच्या प्रगतीची त्यांना कोणतीही चिंता नाही. ते भारताची पुरातन संस्कृती आणि धर्म यांच्या विरोधात असून त्यांना संपविण्याचा कट करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. बिहारमध्ये सीमांचल प्रदेश घुसखोरांनी व्यापला आहे. या घुसखोरांना विरोधी पक्षांचे साहाय्य आहे. ही देशविरोधी कृत्ये थांबविण्याचे कार्य केवळ भाजपच करु शकतो. त्यामुळे लोकांनी पुन्हा एकदा भाजपला संधी द्यावी, असे आवाहन शहा यांनी केले.









