सावंत कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा
ओटवणे : प्रतिनिधी
अमर रहे, अमर रहे, सुभेदार सुनिल सावंत अमर रहे!,भारत माता की जय! सुनिल सावंत अमर रहे अशा घोषणांसह साश्रूपूर्ण नयनांनी पंजाब येथे शहीद झालेले १९ मराठा बटालियनचे जेसीओ सुभेदार तथा कारीवडे गावचे सुपुत्र सुनिल राघोबा सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. तर पोलीस व जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद सुनिल सावंत यांना मानवंदना दिली.शहीद सुनिल सावंत यांचे पार्थिव विमानातून शनिवारी सकाळी नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिरा दिल्ली विमानतळावरून गोवा मोपा विमानतळावर पोहोचले. त्यानंतर गोवा येथून दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव बेळगाव भारतीय सैन्य दलाच्या एएलएस गाडीतून कारीवडे गावात दाखल झाले. त्यानंतर भैरववाडी शाळा ते शहीद सुनिल सावंत यांच्या घरापर्यंत त्यांच्या अंतिम यात्रेस सुरुवात झाली.त्यांचे पार्थिव घरी आणल्यानंतर मुलगी स्नेहल, मुलगा संज्योत, पत्नी सुप्रिया ,वडील राघोबा यांच्यासह सावंत कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.त्यानंतर सुभेदार सुनिल सावंत अमर रहे, जप तक चांद रहेगा सुनिल सावंत का नाम रहेगा अशा भावपूर्ण घोषणांनी त्यांच्या अंतिम यात्रेस सुरुवात झाली. या अंत्य यात्रेत महिलांसह शेकडो ग्रामस्थांचा सहभाग होता.यानिमित्त कारिवडे भैरववाडी शाळा, शहीद सुनिल सावंत यांचे घर ते स्मशानभूमी पर्यंतरस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून तसेच पताका लावून सुनिल सावंत यांना भैरववाडीवासीयांनी आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. शहीद सुभेदार सुनिल सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व माजी सैनिक, महसूल व पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच कारीवडे परिसरातील सर्व महिला ग्रामस्थ येत होते.
यावेळी शहीद सुनिल सावंत यांना भारतीय सैन्य दलाच्या बेळगाव येथील आर्मी, मराठा बटालियन, महसूल व पोलीस आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना दिल्यानंतर शहीद सुनिल सावंत यांचा मुलगा संजय संज्योत सावंत याने अग्नी दिला. आणि सुनील सावंत अमर रहे अशा घोषणांनी शहीद सुनील सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आला.