वारणानगर, प्रतिनिधी
को-जनरेशन प्रकल्पास सहकारी साखर कारखाना व चाष्पक दाब ८७ कि.ग्रॅम /सीएम या प्रकारामधील उत्कृष्ठ सहवीज निर्मिती प्रकल्प द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या उर्जांकूर पॉवर प्रकल्पास सन्मानित करण्यात आले.याबाबतची माहिती वारणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
सदर पुरस्काराचे वितरण शनिवार (दि.१६) रोजी को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, किशोर पाटील, उदय पाटील, श्रीनिवास डोईजड व उर्जाकूरचे संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.आर.भगत यांनी हा मानाचा पुरस्कार स्विकारला.
वारणा कारखाना गेल्या ५ ते ७ वर्षात आर्थिक अरिष्टांतून मार्गक्रमण करीत असताना कारखान्याने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे आज वारणा कारखान्याची वाटचाल पूर्वपदावर सुरु आहे.कारखान्यास यापूर्वी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले असून, या पुरस्कारांच्या मालिकेत यावर्षी कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पास उत्कृष्ठ सहवीज निर्मिती प्रकल्प द्वितीय क्रमांकाच्या मिळालेल्या पुरस्काराने आणखी भर पडलेली आहे.
मागील वर्षी ४४ मे.वॅट क्षमतेचा को-जनरेशन प्रकल्प कारखान्याचा मालकीचा झाले नंतर पहिल्याच हंगामामध्ये को-जनरेशन प्रकल्पातून कारखान्याने १५,७२,९७,९४२ युनिट्स चे उत्पादन घेवून कारखाना गळीत हंगामाकरिता ४,५२, १५.२३७ युनिट्स वापरुन महावितरण कंपनीला ९,८३,५५,५८१.२५ युनिट्स वीजेची निर्यात केलेली आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पाकडून कारखान्यास ५,०७,७६३ मे. टन व अर्क शाळेकडे ४०,३१६ मे.टन व रिफायनरी कडे १७,१७८ मे.टन स्टीम देणेत आलेली आहे. सहकारी साखर कारखाना व बाष्पक दाब ८७ कि.ग्रॅम / सीएम या प्रकारात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांचेकडून द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
या पुरस्काराने साखर कारखानदारी बरोबरच आपल्या कारखान्याने को-जनरेशन प्रकल्पांमध्ये ही नेत्रदिपक कामगिरी केलेने या पुरस्काराच्या माध्यमातून वारणा उद्योग समुहाच्या नावलौकिकात भर पडलेली आहे असे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यानी सांगीतले.