Manerajuri News : मणेराजूरीत महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी रस्त्यावर बसून आज ठिय्या आंदोलन केले.ज्यादा बस सोडत नसल्याच्या कारणावरून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला.गेल्या तीन महिन्यात पाचव्यांदा आंदोलन करण्याची वेळ शाळकरी विदयार्थीनीच्यावर आली आहे .मणेराजूरीमधून तासगावकडे जाणेसाठी बसच नसल्याने मणेराजूरी बस थांब्यासमोर हे आंदोलन करणेत आले .अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तासगांव -कवठेमहांकाळ राज्यमार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. यामुळे वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी झाली.
याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी मणेराजूरी-योगेवाडीसह परिसरातून तासगावकडे कॉलेजला जाणेसाठी विद्यार्थी बसची वाट पाहत होते. मात्र बराचकाळ लोटला तरीही एकही बस आली. अखेर अकरा वाजता कवठेमहांकाळ डेपोची एक बस आली.मात्र ही बस देखील आधीच भरगच्च भरलेली होती. यामुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि चक्क रस्त्यावरच बसूनच आंदोलन सुरु केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. विद्यार्थ्यांनी एसटी रोखून धरत जवळपास तासभर हे आंदोलन सुरू ठेवले.अखेर तासगाव डेपोने ज्यादा एसटी बस सोडलेनंतर या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.तासगावचे पोलीस निरीक्षक नामदेव तारडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून प्रमुख पदाधिकारी व विद्यार्थ्यांना समजावले. तासगाव डेपोची ज्यादा बस मागवून ही कोंडी सोडविली.
मणेराजूरी-योगेवाडीसह परिसरातून चारशे ते पाचशे मुले -मुली तासगाव शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षण घेतात. गावातून कवठेमहांकाळ डेपोच्या सकाळी सात ते अकरा वाजेपर्यत तीन ते चार बसच धावतात. सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतरही चार ते पाचच्या दरम्यान दोन -तीन बसच धावतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. बसमध्ये
गर्दी असल्या कारणाने एक ते दोन बस सोडून तिसऱ्या बसची वाट पाहावी लागते. यामुळे घरी येण्यास देखील उशीर होतो. यामुळे पालकांचीही चिंता वाढते.याबाबत गावतील पदाधिकारी, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने वेळोवेळी तासगाव व कवठेमहांकाळ आगाराला तोंडी व लेखी पत्र पाठवेल आहे. मात्र याकडे आगाराकडून दुर्लक्ष झाले. आंदोलनानंतर तात्पुरती मलमपट्टी होते. मात्र कायमस्वरूपी तोडगा निघत नाही.
डेपोचे अधिकारी व मणेराजूरीचे जि.प.सदस्य सतीश पवार ,बाजार समितीचे संचालक खंडू पवार , उपसरपंच बाळासो पवार ,अरुण पवार ,विजय जमदाडे ,अशोक जमदाडे ,सुनिल लांडगे,सुधीर जमदाडे ,सोनू पवार आदींनी तासगाव पोलीसांनी बोलविलेल्या बैठकीत डेपो अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर कवठेमहांकाळ डेपो मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.तासगाव पोलीस स्टेशनमध्ये विदयार्थ्यासह सुमारे एक तास गोंधळ सुरु होता. ज्यादा बस सोडल्याने तणाव निवळला कवठेमहांकाळ व तासगांव डेपोने या मार्गावर सकाळी व सायंकाळी ज्यादा बस सोडाव्या अशी विदयार्थीनींची मागणी आहे.
या अगोदरही विद्यार्थीनी आंदोलन केल्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव व कवठेमंकाळ डेपोच्या अधिकार्यांची बैठक घेऊन सूचना करुन वेळेत बसचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते ,परंतु हे आदेश डेपो मॅनेजरनी धुडकावले आहेत.कवठेमहांकाळ डेपोच्या प्रमुख अश्विनी किर्दक यांनी तर वेळेत एसटी येत नाही तर शाळा कॉलेजला सुट्टी दया !असा अजब सल्ला दिला आहे. बस कधी सोडणार असे फोनवरून विचाणाऱ्या पदाधिकाऱ्याला दिला आहे.
कुणी एसटीबस देता का ?
मणेराजुरीसह परिसरातील कॉलेज युवतींनी बससाठी हे पाचव्यांदा आंदोलन केले असून, कोणी बस देता का? असे म्हणण्याची वेळ कॉलेज विदयार्थिनीवर आली आहे. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचे वेळेत कॉलेजला न गेल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. गरीब घरच्या मुलांनी शिकायचे नाही का !शासनाचा पास असलेली बस असल्यामुळे विदयार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली खरी पण, एसटीच नसल्यामुळे शिकायचे का नाही ? हा मोठा प्रश्न हा आवासून उभा आहे. यावर काही तोडगा निघणार का ? अशी संतप्त प्रतीक्रिया उमटत आहे.