द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान-लोकमान्य सोसायटीचे कार्यक्रमाला सहकार्य : रसिकांची लक्षणीय उपस्थिती
बेळगाव : संगीतामध्ये ‘या हृदयीचे त्या हृदयी’ करण्याची किमया आहे. याचे प्रत्यंतर देणारी एक सुरेल मैफल शुक्रवारी बेळगावकरांनी अनुभवली. स्व. बाबुराव पुसाळकर स्मृतीप्रित्यर्थ आयोजित संगीत मैफलीमध्ये युवावादक निनाद दैठणकर व लोकप्रिय गायिका देवकी पंडित यांनी रसिकांना आपल्या वादन आणि गायनाने तृप्त केले. लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या या मैफलीला रसिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान व लोकमान्य सोसायटी यांचे सहकार्य लाभलेल्या या मैफलीचे उद्घाटन लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर, देवकी पंडित, निनाद दैठणकर, काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर, निहारिका व शंतनू पुसाळकर, मेधा व रोहन पुसाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून मैफलीचे उद्घाटन केले. दीपप्रज्ज्वलनानंतर किरण ठाकुर यांनी बाबुराव पुसाळकर यांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. औद्योगिक क्षेत्रात अग्रक्रमाने त्यांच्या नावाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावला आल्यावेळी केला होता. किर्लोस्कर आणि पुसाळकर ही उद्योग क्षेत्रातील दोन मोठी नावे. पुसाळकरांनी अनेक कारखानदार घडविले. त्यांना परदेशात जाण्याची संधी दिली. हायड्रोलिक्समध्ये बेळगावचे नाव उंचीवर नेण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या स्मृती कायम राहण्यासाठी एखादी योजना राबवावी, असा मनोदय असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेळगावकर रसिकांनी घेतला आस्वाद
यानंतर संतरवादक निनाद दैठणकर यांनी संतुरवर स्वर छेडून रसिकांना रिझवले. त्यांना तबल्यावर कार्तिक स्वामी यांनी साथ केली. जनरल देसाई यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्रात देवकी पंडित यांची सुरेल मैफल झाली. त्यांच्यासह वादकांचा सत्कार निरजा देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. निहारिका पुसाळकर यांनी आभार मानले. वादन आणि गायनाने समृद्ध अशा या मैफलीचा बेळगावकर रसिकांनी उत्कटतेने आस्वाद घेतला. या मैफलीला केंद्रीय जीएसटी अधिकारी मिलिंद गवई, तसेच पुसाळकर कुटुंबीय यांच्यासह रसिक उपस्थित होते.









