घरी कोणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला
वार्ताहर /उचगाव
उचगाव, तुरमुरी, हिंडलगा व विजयनगर परिसरात गेल्या महिन्याभरात चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून बंद घरामधून घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस खाते सुस्तावल्याने याचा मोठा आर्थिक फटका या भागातील गोरगरीब नागरिकांना बसला आहे. गुरुवारी सायंकाळी तुरमुरी येथे दिवसाढवळ्या तीन लाखाची घरफोडी झाल्याचे उघडकीस आल्याने या संपूर्ण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावामध्ये गुरुवारी सायंकाळी सिद्धराय जाधव यांच्या घरातील सर्व मंडळी शेतावरती कामानिमित्त गेले होते. तर मुलगी कॉलेजला गेली होती. घरी कोणीच नसल्याचे पाहून चोरांनी डाव साधला. घराच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. आणि घरातील तिजोरी फोडून कपाटामध्ये ठेवण्यात आलेल्या सव्वातीन तोळ्याचे गंठण, एक तोळ्याची अंगठी आणि 10 हजार रुपयाची रक्कम चोरट्याने पळवले आहे. सायंकाळी मुलगी कॉलेजवरून घरी आल्यानंतर घराच्या मागील बाजूचे दरवाजे खुले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले. लागलीच तिने आपल्या वडिलांना मोबाईलवरून संपर्क साधला आणि या घटनेची माहिती दिली. घरी येऊन पाहतो तो कपाटाचे दरवाजे खुले होते. आणि आतील सोनं, पैसे चोरांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. यानंतर गावातील नागरिकही जमा झाले. ग्रामपंचायत माजी अध्यक्षा, सदस्य यांनीही घटनास्थळी यावेळी भेट दिली आणि घटनेची नोंद पोलीस स्थानकात देण्यात आली. वडगाव पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.









