निरोपाची लढत असल्याने रोहन बोपण्णावर सारा प्रकाशझोत
वृत्तसंस्था/ लखनौ
डेव्हिस चषक स्पर्धेत आजपासून भारतीय टेनिस संघाची मोरोक्कोविरुद्ध लढत सुरू होणार असून त्यात भारताला जागतिक गट-2 मधून बाहेर काढून बढती मिळवून देणे हे फारसे अवघड काम राहणार नाही असे एकंदर परिस्थिती पाहता दिसून येते. या लढतीत रोहन बोपण्णावर जास्त लक्ष राहणार आहे. कारण त्याची 21 वर्षांची डेव्हिस चषकातील कारकीर्द रविवारी संपुष्टात येणार आहे.
एटीपी सर्किटमधील बड्या खेळाडूंना आव्हान देऊ शकतील अशा एकेरीतील चांगल्या खेळाडूंची कमतरता, जिंकता येण्याजोग्या सामन्यांतील पराभव यामुळे या सांघिक स्पर्धेत गेल्या काही वर्षांत भारतीय संघाची खूप हानी झालेली आहे. परंतु खाली घसरून जागतिक गट-2 मध्ये रवानगी होणे ही नवीन गोष्ट होती आणि फेब्रुवारीमध्ये या घसरणीची नोंद झाली. 2019 मध्ये नवीन रचना लागू झाल्यानंतर प्रथमच भारतीय संघ घसरून या पातळीवर पोहोचलेला आहे. भारत मार्चमध्ये मागील डेव्हिस चषक लढत खेळला होता. त्यात ते डेन्मार्ककडून 2-3 असे पराभूत झाले होते. तेव्हापासून बरेच काही बदलले आहे.
गेल्या आठवड्यात बोपण्णा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला. ते वगळता भारतीय टेनिसच्या वाट्याला या मोसमात क्वचितच संस्मरणीय क्षण आले आहेत. एकेरीमध्ये चांगले निकाल पाहायला मिळालेले नाहीत. त्याशिवाय देशाला आपली एकमेव ‘एटीपी 250’ स्पर्धाही गमवावी लागली आहे. भारताने पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या युकी भांब्रीने एकेरीत खेळणे बंद केले आहे. रामकुमार रामनाथन आघाडीच्या 550 खेळाडूंमधून बाहेर पडून 570 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या मोसमात चेन्नईच्या या खेळाडूचे आव्हान वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 17 वेळा पहिल्या फेरीत संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे जरी रामकुमार खेळाडूंना प्रशिक्षणाच्या बाबतीत मदत करण्यासाठी संघाचा एक भाग असला, तरी कर्णधार रोहित राजपालने मुख्य चमूत त्याचा समावेश केलेला नाही.
43 वर्षांचा बोपण्णा अजूनही दुहेरीत चांगला खेळ करत आहे. त्याला पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे बेंगळूरूमध्ये ही निरोपाची लढत झाली असती, तर त्याच्यासाठी ते आदर्शवत ठरले असते. असे असले, तरी त्याला मायदेशातील चाहत्यांसमोर डेव्हिस चषक स्पर्धेला अलविदा म्हणण्याची संधी मिळणार आहे. 2002 मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने या स्पर्धेत 10 एकेरी लढतींसह 22 सामने जिंकले आहेत. डेव्हिस चषक स्पर्धेत तो शेवटच्या खेपेला युकीसोबत कोर्टवर उतरणार आहे. दरम्यान, ‘एआयटीए’ने गुऊवारी रात्री एका विशेष कार्यक्रमात बोपण्णाचा सत्कार केला. यावेळी भारतीय टेनिसमधील त्याच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू सुमित नागल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या लढतीतून अखेर शशी मुकुंदला पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. दिग्विजय प्रताप सिंगला देखील कदाचित खेळण्याची संधी मिळू शकते. उष्ण आणि दमट हवामान दोन्ही संघांची कसोटी पाहेल. सामन्यांची सुरुवात दोन तास उशिरा होणार असली, तरी ऊर्जा कमी करणाऱ्या परिस्थितीत खेळणे हे कठीण काम राहणार आहे. भारताच्या एकेरीतील खेळाडूंचा विचार करता इलियट बेन्चेट्रिट हा मोरोक्कोकडे फक्त एकच सक्षम आव्हानवीर आहे, परंतु पाहुण्यांनी त्याला नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे सलामीच्या दिवशी न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.









