वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरू असलेल्या 2023 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा आणि त्यानंतर लंकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्याने आयसीसीच्या ताज्या वनडे मानांकनात भारताने दुसरे स्थान मिळवले आहे. मात्र पाक संघाला आपले अग्रस्थान गमवावे लागले आहे. आशियाई स्पर्धेत पाक संघाला अंतिम फेरी गाठता न आल्याने त्यांना अग्रस्थान टिकवता आले नाही.
आयसीसीच्या ताज्या वनडे मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ 118 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. पाक संघाला 115 गुणासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. भारत 116 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेला 22 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून हा दौरा संपवून भारतात दाखल होतील.









