वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान चीनच्या हांगझोयु येथे होणाऱ्या 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवण्यात येणाऱ्या भारतीय क्रीडा चमूमध्ये आणखी 22 नव्या अॅथलिट्सचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 25 बदली खेळाडूंची नावे घोषित करण्यात आली असून त्यात अॅथलिट्स, प्रशिक्षक आणि साहाय्यक प्रशिक्षक वर्गातील सदस्यांचा समावेश आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मॉर्डर्न पेंथेलॉन या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला असून या नव्या क्रीडा प्रकारात भारताचा सहभाग राहणार आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत एकुण 39 क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे सदस्य सहभागी होतील. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी एकूण 665 अॅथलिट्सचा चमू पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 665 अॅथलिट्ससह 260 प्रशिक्षक आणि साहाय्यक प्रशिक्षक वर्गातील सदस्य असे एकूण 921 जणांचे पथक या स्पर्धेसाठी भाग घेणार असल्याचे सांगण्यात आले.
नेमबाजी प्रकारासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय नेमबाजी पथकामध्ये मनीषा कीर, प्रीती रजक, अंगड वीरसिंग बावा, अॅथलेटिक्स प्रकारात अमलान बोर्गोहेन, प्रीती, प्राची, त्याचप्रमाणे जू-जित्सु या क्रीडा प्रकारासाठी अन्वेशा देब, निकीता चौधरी, उमा महेश्वर, कमल सिंग, तरुण यादव, जलतरण प्रकारासाठी जानवी चौधरी, वुशु प्रकारासाठी सुरज यादव, मॉर्डर्न पेंथेलॉनसाठी एकमेव अॅथलिट्स मयांक चाफेकर, कुराश या प्रकारासाठी विशाल रुहिल, केशव सुचिका तारिहाळ आणि ज्योती टोकास, पुरुषांच्या सांघिक परस्युएट सायलिंग प्रकारामध्ये वेंकप्पा केनगेलगुट्टी, निरज कुमार, मनजीत कुमार आणि दिनेशकुमार यांचा समावेश आहे. 2018 साली इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत हेंगझोयु आशियाई स्पर्धेसाठी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या दिवसाच्या पॉकेटमनीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेले नाही पण खेळाडूला देण्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशीच्या भत्यामध्ये 50 अमेरिकन डॉलर्सची वाढ करण्यात आली आहे.









