इंग्लंडची लंकेवर मालिकाविजय, तिसऱ्या सामन्यात लंकेचा 161 धावांनी पराभव
वृत्तसंस्था/ लिसेस्टर
यजमान इंग्लंड आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात झालेली तीन सामन्यांची वनडे मालिका इंग्लंडने 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यातील इंग्लंडने लंकेचा 161 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी सदर लढत प्रत्येकी 31 षटकांची खेळवली. इंग्लंडची कर्णधार नॅट स्किव्हर ब्रंटने आपल्या या शतकी वनडे सामन्यात जलद शतक झळकवले. तिने 74 चेंडूत 1 षटकार आणि 18 चौकारासह 120 धावा झोडपल्या.

या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 31 षटकात 8 बाद 273 धावा जमवल्या. त्यानंतर लंकेचा डाव 24.5 षटकात 112 धावात आटोपला.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीची ब्युमाँट केवळ 2 धावावर बाद झाली. त्यानंतर अॅलिस कॅप्से 6 धावावर तंबूत परतली. लंकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडचे हे पहिले दोन फलंदाज लवकर बाद केले पण त्यांना त्यानंतर बाऊचर आणि नॅट स्किव्हर ब्रंट यांच्या तुफानी फटकेबाजीमुळे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करता आली नाही. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 193 धावांची भागीदारी 20 षटकात झळकवली. बाऊचरचे शतक केवळ 5 धावांनी हुकले. बाऊचरने 65 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारासह 95 धावा जमवल्या. कर्णधार ब्रंट चौथ्या गड्याच्या रुपात तंबूत परतली. जोन्स 1 चौकारासह 9, हिथने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 21, डिनने नाबाद 2 तर ग्लेनने 7 धावा जमवल्या. इंग्लंडच्या डावात 4 षटकार आणि 35 चौकार नोंदवले गेले. लंकेतर्फे कविशा दिलहारीने 42 धावात 3 तर प्रबोदिनी, कुलसुर्या आणि रणविरा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव केवळ 24.5 षटकात 112 धावात आटोपला. लंकेच्या एकाही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. हसिनी पेरेराने 24 चेंडूत 6 चौकारासह 32, करुणारत्नेने 1 चौकारासह 15, संजीवनीने 2 चौकारासह 13, कर्णधार चमारी अट्टापटूने 2 चौकारासह 12 तसेच कुलसुर्याने 3 चौकारासह 12 आणि रणविराने 1 चौकारासह 8 धावा केल्या. लंकेच्या डावात 16 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे चार्ली डिनने 31 धावात 5 तर फिलेरने 30 धावात 3 तसेच माहिका गौर आणि ग्लेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
इंग्लंडची कर्णधार नॅट स्किव्हर ब्रंटचा हा वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीतील 100 वनडे सामना आहे. या शतकी सामन्यामध्ये तिने जलद शतक नोंदवण्याचा विक्रमही केला. ब्रंटने केवळ 66 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडतर्फे जलद शतक नोंदवणारी नॅट स्किव्हर ही पहिली फलंदाज ठरली आहे.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 31 षटकात 8 बाद 273 (बिमाँट 2, बाऊचर 95, कॅप्से 6, नॅट स्किव्हेर ब्रंट 120, अॅमी जोन्स 9, हिथ 21, डिन नाबाद 2, ग्लेन 7, अवांतर 9, कविशा दिलहरी 3-42, प्रबोदिनी 1-38, कुलसुर्या 1-48, रणविरा 1-53), श्रीलंका 24.5 षटकात सर्वबाद 112 (हसिनी परेरा 32, चमिरा अट्टापटू 12, अनुष्का संजीवनी 13, करुणारत्ने 15, कुलसुर्या 12, रणविरा नाबाद 8, अवांतर 5, चार्ली डिन 5-31, फिलेरने 3-30, गौर 1-29, ग्लेन 1-21).









