महादेव सट्टा कंपनीवरच्या धाडीत 417 कोटींची मालमत्ता हस्तगत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बेकायदा सट्टेबाजी चालविणाऱ्या ‘महादेव ऑनलाईन बेटींग कंपनी’वर टाकलेल्या धाडीत ईडीच्या हाती रोख रक्कम आणि बेहिशेबी स्थावर मालमत्ता मिळून 417 कोटी रुपयांचे घबाड लागले आहे. काही दिवसांपूर्वी ही धाड टाकण्यात आली. या कंपनीचे व्यवहार प्रामुख्याने दुबईतून चालत होते. ही कंपनी सौरभ चंद्रशेखर आणि रवी उप्पाळ यांनी प्रवर्तित केली आहे. मात्र, या कंपनीचे खरे सूत्रधार कोण आहेत, याचा तपास ईडीकडून केला जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
या कंपनीवरचे धाडसत्र गेल्या आठवड्यात सुरु करण्यात आले होते. ऑन लाईन बेटींगच्या माध्यमातून मनी लाँडरिंग करण्यात येत होते. बेटींग अॅप्स तयार करुन त्यावरुन नवे खातेदार निर्माण करणे आणि युजर आयडी बनवून कोट्यावधी रुपयांचे लाँडरिंग करणे असा धंदा ही कंपनी करत असल्याची माहिती मिळताच धाडसत्र सुरु करण्यात आले होते. आता पुढील कारवाई करण्यात येत आहे.
विविध शहरांमध्ये धाडी
महादेव अॅपवर कोलकाता, भोपाळ, मुंबई आणि इतर शहरांमध्ये धाडी टाकण्यात आल्या. शेकडो कोटी रुपयांच्या बेकायदा व्यवहारांची कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे एकंदर रोख रक्कम आणि स्थावर मालमत्ता मिळून 417 कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींविरोधात आरोपपत्र लवकरच सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
मध्यस्थांकडून व्यवहार
या कंपनीने आपले अनेक मध्यस्थ (फ्रांचायझी) नियुक्त केले होते. त्यांच्या हातून बेटींगचा धंदा चालविला जात असे. नफ्याची विभागणी 30:70 या प्रमाणात केली जात असे. भारताबाहेर अनेक खोटी खाती बनवून त्यांवर बेटींगमधील पैसा वळविला जात असे. बेटींग किंवा सट्टा वेबसाईटस्च्या जाहिरातींवरही भारतात कोट्यावधी रुपये खर्च केले जात असत, असे तपासात उघड झाले आहे.
आरोपी मूळचे छत्तीसगडमधील
या प्रकरणात समोर आलेले दोन्ही आरोपी मूळचे छत्तीसगडमधील आहेत. त्यांच्या कंपनीचे मूळ नाव महादेव ऑन लाईन बुक बेटींग अॅप्लिकेशन’ असे आहे. ही एक ‘समूह’ कंपनी असून देशात विविध शहरांमध्ये मध्यस्थ कंपन्यांच्या माध्यमातून ही कंपनी बेकायदा आर्थिक व्यवहार करत असे. आतापर्यंत किती व्यवहार केले, याची माहिती संकलित केली जात आहे, असे स्पष्ट करण्यात आले.









