सर्वसाधारणपणे कमी अंतराच्या किंवा कमी दिवसांच्या प्रवासातही बरेच सामान घेऊन जाण्याची भारतीय लोकांना सवय असते. विशेषकरून रेल्वेंमध्ये अशाप्रकारचे दृश्य मोठ्या प्रमाणात दिसून येते. एअरलाइन्समध्ये अधिक वजनावर शुल्क आकारले जात असल्याने लोक मर्यादित वजन नेऊ शकतात. परंतु तेथेही ते कमाल मर्यादेसमीप पोहोचत असतात. तर दुसरीकडे आता सस्टेनेबल ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड वाढला असून प्रवाशांना कमीत कमी सामानासह प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. जगातील काही प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर काही प्रकारच्या लगेजवर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. काही काळानंतर भरभक्कम सूटकेस आणि लगेज घेऊन प्रवास करणे इतिहासजमा ठरू शकते. अखेर कमी पॅकिंग करून, आम्ही कमी कार्बन उत्सर्जन करतो, तसेच स्वत:चे ट्रॅव्हल फुटप्रिंट देखील कमी करू शकतो. तसेच अधिक सुविधाजनक आणि व्यवस्थितप्रकारे फिरण्यास सक्षम ठरतो. भारतातील अनेक पर्यटनस्थळांवर लोकांच्या गर्दीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. अलिकडेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे सस्टेनेबल टूरिजमची गरज अधेरेखित झाली आहे.
जगात अनेक ठिकाणी जाण्यापूर्वी आता स्वत:च्या लगेजकडे लक्ष देण्याची गरज भासणार आहे. जगातील अनेक देशांमध्ये विविध प्रकारे सस्टेनेबल टूरिजमला बळ दिले जात आहे. व्हेनिसमध्ये व्हीलयुक्त सूटकेसवर बंदी घालण्यात आली आहे. क्रोएशियाच्या डुब्रोवोनिक शहरात देखील हा नियम लागू करण्यात आला आहे. केनिया, टांझानिया आणि यूगांडामध्ये देखील टूर ऑपरेटर्स पर्यटकांना सफारीसाठी कमीत कमी लगेज आणण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करत आहेत. स्वीत्झर्लंडमधील आल्प्सच्या पर्वतरांगेसोबत फ्रान्स तसेच ऑस्ट्रियामध्ये रिसॉर्ट लोकांना विंटर स्पोर्ट्सची उपकरणे आता भाडेतत्वावर उपलब्ध करत आहेत.









