गोकुळची 61वी सर्वसाधारण सभा आज शिरोली एमआयडीसीतील महालक्ष्मी पशुखाद्याच्या हॉलमध्ये होत आहे. या सभेकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असून गोकुळच्या सभेत महाडिक समर्थक घुसल्याने पोलीसांची एकच तारांबळ उडाली आहे. विरोधी महाडीक गटाच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या गोकुळ दुधसंघाची 61 वी सर्वसाधारण सभा आज संपन्न होत असून सभेच्या ठिकाणी महाडिक समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपुर्ण बनले आहे. महाडिक समर्थकांचा जमाव अचानक सभागृहात घुसल्याने पोलीसांची एकच तारांबळ उडाली आहे. या सभेच्या ठिकाणी ठराव आणि ओळखपत्र दाखवल्याशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. ठराव आणि ओळखपत्र अशी कागदपत्रे पाहूनच पोलीस प्रवेश देत होते. पण पोलिसांची सुरक्षा आणि बॅरिगेट्स तोडून महाडिक समर्थक सभेत घुसले. तसेच काही ठरवावर आक्षेप घेतल्याने महाडिक समर्थक आक्रमक झाले.
काही वेळानंतर महाडीक गटाच्या नेत्या आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडीक सभागृहाच्या ठिकाणी पोहोचल्या माध्यमांशी बोलताना त्यांनी सभागृहातील अर्धे सभासद बोगस असल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या, “सभागृहामध्ये जे सभासद उपस्थित आहेत ते सर्व बोगस असून त्यांना ठरावाची झेरॉक्स वाटून प्रवेश दिला आहे. सत्ताधाऱ्यांना खरे सभासद नको म्हणून एव्हढा बंदोबस्त आणि बॅरिकेड्स लावले आहेत. खरे सभासद हे सभागृहाच्या बाहेर असून ते शाहुवाडीसारख्या लांबून आले आहेत.” असा आरोप त्यांनी केला.








