पुणे / वार्ताहर :
पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर नगरपरिषदेच्या कार्यालयात आरोग्य विभागातील एका अभियंता महिलेला आठ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले, तर लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून नगरपरिषदेतील मुख्याधिकारी आणि लेखपालाच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारुबला राजेंद्र हरडे (वय-31, अभियंता आरोग्य विभाग खेड) असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे, तर मुख्याधिकारी श्रीकांत अण्णासाहेब लाळगे (वय-35), लेखपाल प्रविण गणपती कापसे (वय-35) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत एका 29 वर्षीय ठेकेदाराने आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सरकारी ठेकेदार आहेत. त्यांनी राजगुरूनगर नगरपरिषद येथील आरोग्य विभागासाठी लागणारे साहित्य पुरविले होते. त्याचे 80 हजार 730 रुपयांचे बिल सादर केले होते. ते बील काढून देण्यासाठी हरडे यांनी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. दरम्यान तक्रारीची पडताळणी केली असता, हरडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने नगरपरिषदेच्या कार्यालयात सापळा लावून हरडे यांना आठ हजार रुपयांची लाच घेताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. इतर दोघांवर लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.








