विनाकारण फिरणाऱ्यांवर बडगा : रोज 400 जणांची चौकशी
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी व्यापक तयारी सुरू केली आहे. याबरोबरच वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. मध्यरात्रीपर्यंत शहरात विनाकारण फिरणाऱ्यांचे फिंगर प्रिंट (ठसे) घेण्याचा सपाटा पोलीस दलाने सुरू केला आहे. नव्याने पोलीस उपायुक्त पदावर रुजू झालेल्या रोहन जगदीश यांच्या सूचनेवरून सर्वत्र मटका, जुगारी अ•dयावर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत विनाकारण फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर अशांचे फिंगर प्रिंट घेतले जात असून रोज 400 हून अधिक जणांची फिंगर प्रिंट संकलित केले जात आहेत.
एखाद्या गुन्हेगारी प्रकरणानंतर पोलीस श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करतात. घटनास्थळावर मिळालेल्या ठशांचे नमुने घेतले जातात. ते सुरक्षितपणे ठेवले जातात. गृहखात्याने पोलिसांनी फिंगर प्रिंट घेण्यासंबंधी नवी यंत्रणा पुरविली असून जर पोलिसांच्या काळ्या यादीतील गुन्हेगार असेल तर फिंगर प्रिंटवरून तो लगेच सापडतो. बुधवारी रात्री तर 451 हून अधिक जणांचे फिंगर प्रिंट घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. खासकरून संवेदनशील भागात विनाकारण रात्री उशिरापर्यंत घोळक्याने थांबणारे व फिरणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसांत 4 हजारहून अधिक जणांचे फिंगर प्रिंट
गेल्या आठ दिवसांत 4 हजारहून अधिक जणांचे फिंगर प्रिंट घेण्यात आले आहेत. रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांना यासंबंधी सूचना करण्यात आली असून या काळात 150 हून अधिक संशयितांना रात्रीच्या वेळी पोलीस स्थानकात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. बुधवारी रात्री बेळगाव परिसरातील 17 लॉजिंगची तपासणी करण्यात आली आहे.









