विमानतळावर एनआयएची कारवाई
बेंगळूर : शिमोग्यात बॉम्बस्फोटाची चाचणी घेतल्याचा आरोप असणाऱ्या आयएसआयएसच्या संघटनेच्या संशयित दहशतवाद्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. अराफत अली असे त्याचे नाव असून तो मुळचा शिमोगा जिल्ह्यातील आहे. तो नैरोबीहून विमानाने दिल्लीला आला होता. याविषयी सुगावा लागताच एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याला गजाआड केले आहे. संशयित दहशतवादी अराफत अली हा मुळाचा शिमोगा जिल्ह्याच्या तीर्थहळ्ळी येथील असून 2019 मध्ये तो बेंगळूरला स्थायिक झाला होता. अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर त्याने दुबई येथील पर्फ्युम कंपनीत नोकरी मिळविली. त्यानंतर तो अज्ञात स्थळी होता. तो आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. विदेशात राहूनच आयएसआयएस संघटनेचा प्रचार, घातपात घडविण्यासाठी युवकांची नेमणूक, दहशतवादी कृत्यांसाठी उत्तेजन आणि पैसा पुरवत होता, असा आरोप त्याच्यावर आहे. 2020 पासून तो बेपत्ता होता. केनियाच्या नैरोबीहून दिल्लीला येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे.









