पुणे / प्रतिनिधी :
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शुक्रवारपासून विदर्भ, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत ऑरेंज तसेच यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओरिसा व लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर आहे. येत्या दोन दिवसांत हे क्षेत्र ओरिसा व छत्तीसगड पार करणार आहे. याबरोबरच राजस्थानपासून ओरिसाच्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या दरम्यान ट्रफ पसरला असून, हा ट्रफ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंडवरुन जात आहे. उत्तरप्रदेश व मध्य प्रदेशच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून, यामुळे विदर्भात शुक्रवारी काही जिल्हय़ांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शनिवारी विदर्भ, मराठवाडा, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे व साताऱ्यातील घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्हय़ाच्या अनेक भागांत ऑरेंज अलर्ट व राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जिल्हय़ांत ऑरेंज अलर्ट, पुणे साताऱ्यातील घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट,विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारपासून पावसाचा जोर ओसरणार असून, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.








