महाराष्ट्र, गोवा येथील मंडळांकडून तयार मूर्ती नेण्यावर भर : गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी परगावची मंडळे सक्रीय
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने सर्वत्र लगबग सुरू आहे. बेळगावमध्ये नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती तयार होत असल्यामुळे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील अनेक गणेशोत्सव मंडळे बेळगावमधून मूर्ती घेऊन जातात. यावर्षीही बेळगावमधील मूर्तिकारांनी तुमकूर, दावणगिरी, हावेरी, हैद्राबाद, मिरज, सांगली, इचलकरंजी, चंदगड, गोवा येथील मंडळांच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. बेळगावमध्ये अनेक मूर्तिकार पारंपरिक पद्धतीने शाडू व मातीपासून गणेशमूर्ती तयार करतात. त्यामुळे इकोफ्रेंडली गणेशमूर्ती खरेदी करणारे भाविक पारंपरिक मूर्तिकारांकडूनच मूर्ती खरेदी करतात. बेळगाव शहर व उपनगरांमध्ये अनेक मूर्तिकार असून काही जण घरगुती तर काही जण सार्वजनिक गणेशमूर्ती तयार करतात. घरगुती गणेशमूर्ती यापूर्वीच विक्री झाल्या असून आता सार्वजनिक गणेशमूर्तींची तयारी सुरू आहे. गणेशमूर्तींचे रंगकाम पूर्ण होत आले असून मूर्तिकार त्यावर अखेरचा हात फिरवत आहेत.
बेळगावमधील अनगोळ, वडगाव, शहापूर परिसरात बरेच मूर्तिकार आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र, गोवा तसेच आंध्रप्रदेशमधूनही त्यांना मूर्तींची ऑर्डर होती. परगावच्या गणेशमूर्ती तयार झाल्या असून लवकरच त्या पाठविल्या जाणार आहेत. हव्या त्या आकारातील सुबक सार्वजनिक गणेशमूर्ती तयार करण्याचा बेळगावच्या मूर्तिकारांचा हातखंडा असल्यामुळे दूरवरच्या गावांमधूनही मंडळांचे कार्यकर्ते बेळगावमध्ये येत असतात. इतर गावांमध्ये घरगुती गणेशमूर्ती तयार होत असल्या तरी बेळगावमध्ये भव्यदिव्य आणि नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती तयार होत असल्याने मूर्तिकारांकडे ऑर्डर देण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची झुंबड उडालेली असते. गणेशोत्सव काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी परगावची मंडळे आतापासूनच गणेशमूर्ती घेऊन जात आहेत. त्यामुळे दूरवरच्या गावांमध्येही बेळगावच्या मूर्तिकारांचा गाजावाजा होत आहे.
गणेशमूर्ती घडविण्यात बेळगावकरांचा वेगळा ठसा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेळगावसह तुमकूर, शिमोगा, दावणगिरी, हुबळी, धारवाड या परिसरातून गणेशमूर्तींची ऑर्डर होती. मंडळांच्या मागणीप्रमाणे गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या असून परगावची मंडळे गणेशमूर्ती घेऊन जात आहेत. बेळगावच्या मूर्तिकारांनी गणेशमूर्ती घडविण्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटविल्यामुळे बेळगावच्या मूर्तींना मागणी अधिक आहे.
-विशाल गोदे, मूर्तिकार









