येळ्ळूर ग्राम पंचायतीला देण्यात आले निवेदन
येळ्ळूर : बुडाने कोणालाही विश्वासात न घेता शहरापासून 15 कि. मी. वर असलेली 28 गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बुडाच्या बैठकीत ठराव करण्यात आला. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून त्या विरोधात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी येळ्ळूर ग्राम पंचायतीला माजी महापौर शिवाजी सुंठकर व इतर कार्यकर्त्यांनी भेट दिली व ग्राम पंचायतमध्ये त्याच्या विरोधात ठराव करावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील आणि पीडीओ पूनम गाडगी यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे. बुडाचा विस्तार वाढविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला तरी या मागचा कुटिल डाव ओळखणे गरजेचे आहे. येळ्ळूर गावचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होणार असून ग्राम पंचायतींनी याबाबत ठराव करून तो ठराव बुडाकडे पाठवावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी बुडाने शहरालगत असलेल्या अनेक गावांची जमीन हिसकावून घेतली होती. त्यामुळे शेतकरी भूमीहीन झाले आहेत. आता या 28 गावांतील जमिनीही हिसकावून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या 28 गावांतील शेतकरी भूमीहीन होणार आहेत. यापूर्वीदेखील असा प्रयत्न करण्यात आला होता. त्याला तीव्र विरोध झाला होता. आताही एकजुटीने त्याला विरोध करावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. येळ्ळूर ग्राम पंचायतनंतर सुळगा (ये.), राजहंसगड या ठिकाणीही जाऊन याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी कृषी पत्तीन सोसायटीचे चेअरमन प्रदीप देसाई, ब्रम्हलिंग सोसायटीचे संस्थापक गोविंद काळसेकर, पांडुरंग पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य शिवाजी पाटील, ग्राम पंचायत सदस्य शशी धुळजी, माजी ग्रा. पं. अध्यक्ष भोला पाखरे, पुंडलिक पावशे, नारायण सावगांवकर, किसन सुंठकर, नंदकुमार पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









