बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे बेळगाव तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुलांच्या फुटबॉल स्पर्धेट सेंट पॉल्स संघाने एमव्ही हेरवाडकर संघाचा 3-0 तर प्राथमिक गटात सेंट झेवियर्सने एमव्ही हेरवाडकरचा 3-2 असा पराभव करुन विजेतेपद पटकावित जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन शहर पीईओ जी. बी. पटेल, प्रशांत देवदानम, अँथोनी डिसोझा, महेश हागिदाळे, प्रकाश बजंत्री, शाकिब बेपारी आदी उपस्थित होते. या स्पर्धेत प्राथमिक गटात चार संघांनी भाग घेतला आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने सरकारी मुलांच्या 17 नं. संघाचा 4-0 तर एमव्ही हेरवाडकरने वडगाव क्लस्टरचा 2-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सच्या रोशन अबासने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली.
तर दुसऱ्या सत्रात हेरवाडकरच्या आशिष मुचंडीने गोल करुन बरोबरी साधली. शेवटी पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये झेवियर्सने 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला. झेवियर्सतर्फे रोशन अबास, आर्कन बडेघर व ओम पुजारी यांनी गोल केले. तर हेरवाडकरतर्फे आशिष व रोशन यांनी गोल केले. माध्यमिक गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट पॉल्सने शर्मन संघाचा 3-0 असा पराभव केला. सेंट पॉल्सतर्फे जोश्वा वॉझ, शनन कोलकार व जिदान यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एमव्ही हेरवाडकरने भरतेश संघाचा 2-0 असा पराभव केला. अंतिम सामन्यात सेंट पॉल्सने हेरवाडकरचा 3-0 असा पराभव केला. पहिल्या सत्रात 12 व्या मिनिटाला जोश्वा वॉझने पहिला गोल केला. तर 22 व्या मिनिटाला इशानने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 30 व्या मिनिटाला जोश्वा वॉझने तिसरा गोल करुन संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे कॅम्प विभागीय क्रीडा शिक्षण यांच्या हस्ते विजेत्या सेंट पॉल्स व झेवियर्स तर उपविजेत्या हेरवाडकर संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून कौशिक पाटील, दर्शन व सुमित यांनी काम केले.









