कोल्हापूर प्रतिनिधी
रंकाळा टॉवर रिक्षा स्टॉप समोर कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य पाईपलाईन गळती लागली आहे. पाणीपुरवठा सुरू असल्याने गळती काढता आली नसल्याने दिवसभर येथून शुद्ध केलेले हजारो लिटर पाणी वाया गेले.
कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावरील संकट कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. पाईपलाईनला गळती लागणे, उपसा केंद्रातील मोटर बंद पडणे, उपसा केंद्राच्या परिसरातील विद्युत पुरवठा बंद होणे असे प्रकार वारंवार होत आहेत. परिणामी शहरातील पाणीपुरवठा खंडीत होत आहे. नागरीकांना पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ येत आहे. दोन दिवसांपूर्वी चंबुखडी येथील विद्युतपुरवठा बंद झाल्याने उपसा केंद्र बंद राहिले. यामुळे शहरात दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आता रंकाळा टॉवर येथे पाईपलाईनला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येथे पाईपलाईनला गळती लागल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरूस्तीसाठी खुदाई केली होती. दुरूस्ती झाली नसल्याने गुरूवारी पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. अगोदरच दोन दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे येथील पाणीपुरवठा बंद करणे शक्य नसल्याने गळती काढता आली नाही. व्हॉल्व बंद केला असून पाणीपुरवठा झाल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेणार असल्याचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले आहे.