पंतप्रधान मोदी यांचा मध्यप्रदेशात घणाघात, लोकांनी सावध होण्याचे आवाहन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विरोधी पक्षांनी स्थापन केलेली ‘इंडी’ आघाडी ही घमेंडखोर असून ती सनातन धर्म नष्ट करु इच्छित आहे. हिंदू धर्म संपविणे हाच या आघाडीचा छुपा कार्यक्रम आहे. भारतातील लोकांनी या आघाडीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. ते मध्यप्रदेशात सागर जिल्ह्यातील जाहीर सभेत भाषण करीत होते.
विरोधी पक्षांना भारताची एकात्मता सहन होत नाही. त्यांच्यातील काही गट आता धर्माच्या नावावर समाजात फूट पाडू इच्छित आहेत. भारताचा मूळ धर्म आणि भारतीय संस्कृती उध्वस्त करण्याचा छुपा कार्यक्रम त्यांनी ठरविला आहे. या आघाडीने सनातन धर्म संपविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे लोकांनी या आघाडीला आता तिची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. ‘सनातन धर्म संपवा’ असे जाहीर आवाहन करुन या इंडी आघाडीने सभ्यता आणि संयमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भारताच्या संस्कृतीसमोर त्यांनी उभे केलेले हे आव्हान मोडून काढल्याशिवाय आता आपण स्वस्थ बसता कामा नये. आज त्यांनी सनातन धर्माला लक्ष्य केले आहे. उद्या ते याच्यापेक्षाही पुढची पायरी गाठतील. ते भारतालाच संपविण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना वेसण घालणे हे आमचे कर्तव्य आहे, अशी कठोर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
द्रमुकची मुक्ताफळे
तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म हा कोरोना, हिंवताप, डेंग्यू यांच्या विषाणूंसारखा आहे असे प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधान केले होते. या विषाणूंचा जसा नायनाट करणे आवश्यक असते, तसा सनातन धर्माचाही शेवट केला पाहिजे, अशी उद्दाम भाषा त्यांनी केली होती. त्यांच्यावर चहूकडून टीकेचा भडिमार झाल्यानंतर त्यांनी मवाळ होत सारवासारवीची भाषाही केली होती. तथापि, त्यांच्याच पक्षाचे नेते ए. राजा यांनी त्याही पुढची पायरी गाठत सनातन धर्म हा एडस् किंवा महारोगाच्या विषाणूसारखा असल्याचे विधान केले होते. त्यामुळे आगीत तेल ओतले गेले होते.
भाजपच्या हाती आयता मुद्दा
या बेजबाबदार विधानांमुळे भाजपच्या हाती आयताच मुद्दा लागला आहे. भाजपच्या प्रत्येक मंत्र्याने या नेत्यांच्या विधानांचा कठोर प्रकारे प्रतिवाद केला पाहिजे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी स्वत:ही गुरुवारच्या जाहीर सभेत हिंदूधर्मद्वेष्ट्यांवर कुठाराघात केला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ‘सनातन किंवा हिंदू धर्म हा भारताचा राष्ट्रीय धर्म आहे. तो सत्तेसाठी लाचार झालेल्यांकडून कधीच नष्ट होणार नाही,’ असे विधान याच संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.









