बुधवारी दिल्लीत आयएनडीआयए आणि भारतीय जनता पक्ष यांच्या बैठका पार पडल्या असून एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. काहीही करुन यावेळी भारतीय जनता पक्ष आणि रालोआ यांना केंद्रातील सत्तेतून दूर करायचेच, अशा विचाराने विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न चालविला आहे. आपल्या आघाडीचे नाव त्यांनी आयएनडीआयए या इंग्रजी अद्याक्षरांनी निर्माण पेले आहे. या आघाडीच्या समन्वय समितीची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीसंबंधी अनेक अपेक्षा आधीपासूनच वृत्तपत्रांमधून आणि वृत्तवाहिन्यांवरुन व्यक्त केल्या जात होत्या. वातावरण निर्मिती केली जात होती. त्यामुळे या बैठकीत विरोधी पक्षांच्या जागावाटपाच्या दृष्टीने काही घडते का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष होते. तथापि, नेमक्या या महत्त्वाच्या आणि कळीच्या विषयावर कोणतीही हालचाल न करता ही बैठक संपल्याचे स्पष्ट होत आहे. जागावाटपाचा प्रश्न तूर्तास टाळला गेल्याचे प्रतिपादन नंतर करण्यात आले. मात्र, आघाडीची पहिली जाहीर सभा मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे घेण्याचे ठरविण्यात आले. इतर निर्णय केवळ औपचारिक होते आणि फारसे महत्त्वाचे नव्हते. त्यामुळे त्यांची दखल घेण्याचे कारण नाही. जागा वाटपाच्या प्रश्नावर चर्चा झाली पण घटकपक्षांमधील मतभेद उघड झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या बैठकीच्या वेळी पत्रकारांना मज्जाव असल्याने नेमके काय घडले हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागा वाटपावर एकवाक्यता निर्माण होण्यासाठी अद्याप बराच चढ चढून जावा लागणार, हे स्पष्ट झाले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी एक महत्त्वाची सूचना केली असे समजते. या सूचनेनुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा विरोधी पक्षांनी जिंकलेल्या आहेत, त्यांच्यासंबंधी कोणतीही चर्चा केली जाऊ नये. याचाच अर्थ असा की ज्या पक्षाने जी जागा जिंकली आहे, ती त्याच पक्षाकडे राहू दिली जावी. ही सूचना मान्य झाल्यास अनेक राज्यांमध्ये समस्या निर्माण होणार आहेत. उदाहरणार्थ, केरळमध्ये काँग्रेसने 20 पैकी 18 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसच्या मित्रपक्षाने एक जागा जिंकली आहे. या सर्व जागांवर आहे त्याच पक्षाचे उमेदवार द्यायचे ठरल्यास त्या राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागेल. याला ती आघाडी तयार होईल का हा प्रश्न आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर आहे. काँग्रेसने लोकसभेच्या 13 पैकी 8 जागा जिंकलेल्या आहेत. मग आम आदमी पक्ष 5 जागांवर समाधानी होईल का? असाही मुद्दा आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने 22 जागा जिंकल्या आहेत. उरलेल्या 20 पैकी त्या किती जागा काँग्रेस आणि डाव्यांना सोडायला तयार होतील, याची शाश्वती नाही. बिहार, उत्तरप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये अशीची स्थिती आहे. महाराष्ट्रातही पूर्वीच्या शिवसेनेचे 18 खासदार होते. एवढ्या जागा यावेळी त्या पक्षाला लढवावयास दिल्या जातील का, यासंबंधी साशंकता आहे. हेच मुद्दे समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत उपस्थित झाले असावेत आणि त्यामुळे जागावाटपाच्या हालचाली टाळल्या गेल्या असाव्यात असे मानण्यास जागा आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीसमोर सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक ठरु शकेल असा हा एकमेव मुद्दा आहे. त्यावर तोडगा कसा काढला जातो आणि तोडगा काढला जाऊ शकतो तरी की नाही, याचे उत्तर कालांतराने मिळेल असे वाटते. ‘शक्य तितक्या ठिकाणी’ जागांसंबंधात समझोता होईल अशी सूचना भाषा मागच्या मुंबईतील बैठकीनंतर करण्यात आली होतीच. ती या अडचणी गृहित धरुनच करण्यात आली असावी. एकंदरीत पाहता, समन्वय समितीच्या या पहिल्या बैठकीत नाव घेण्यासारखे काही हाताला लागले नसल्याचे दिसून येत आहे. अर्थात, ते साहजिक आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नानंतर विश्लेषकांनीही कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करुनच भाष्य करणे योग्य ठरेल. दुसरीकडे दिल्लीतच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ती विधानसभा निवडणुकांसाठी असल्याचे घोषित करण्यात आले असले तरी वातावरण लोकसभेच्या निवडणुकीला साजेसेच होते. भाजपचा मार्ग सुनिश्चित आहे. या पक्षासमोर चेहरा किंवा नेतृत्व शोधण्याची समस्या नाही. जागावाटपाची फारशी अडचण नाही. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीत हाच पक्ष सर्वात मोठा आहे. या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच पक्षाचे आणि आघाडीचे नेतृत्व करणार, हे निश्चित आहे. शिवाय, नुकत्याच पार पडलेल्या जी-20 शिखरपरिषदेच्या माध्यमातून भारताचा डंका जगभरात वाजत असल्याने ते या पक्षासाठी एक प्रकारचे शक्तीवर्धक ठरले आहे. साहजिकच याचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले जाते आणि त्यात वावगे असे काहीच नाही. परिणामी, बैठकीसाठी ते जेव्हा भाजपच्या मुख्यालयात आले, तेव्हा त्यांचे दणदणीत स्वागत करण्यात आले. जल्लोषात जयघोष करण्यात आला. त्यांनीही नेहमीच्या शैलीत जोरदार भाषण करुन कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोम वाढविला. या बैठकीत नेते आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला. अशा प्रकारे एकीकडे अतिसावध, काहीसे साशंक, बिकट मार्गावरुन वाटचाल होत आहे, असे वाटावे असे वातावरण होते, तर दुसरीकडे उत्साह, जोम आणि निर्धार यांचे दर्शन घडत होते. अर्थात यावरुन कोण यशस्वी होणार, याची भविष्यवाणी करणे योग्य ठरणार नाही. कारण, अद्याप लोकसभा निवडणुकीचा परिणाम समोर येण्यास साडेआठ महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा कालावधी म्हटले तर लहान, आणि म्हटले तर मोठाही आहे. अद्याप बरेच काही घडू शकते. पण जे काही घडणार आहे, त्यासंबंधी उत्कंठा निर्माण व्हावी, अशी वातावरणनिर्मिती मात्र निश्चितच झालेली आहे, असे म्हणता येते.
Previous Articleअधिकाऱ्यांची झडती! यंत्रणेला गती?
Next Article एनबीसीसीला मिळाली ऑर्डर, समभाग तेजीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








