2019 नंतर आयसीसी क्रमवारीत प्रथमच भारताचे तीन खेळाडू टॉप टेनमध्ये
वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीचा त्याला फायदा झाला आहे. त्याचे हे आजवरचे सर्वोच्च मानांकन आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारताने एकही सामना गमविलेला नाही. आघाडी फळीतील रोहित, गिल व कोहली या फलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळेच भारताला हे यश मिळाले आहे. गिलप्रमाणेच कोहलीनेही मानांकनात दोन स्थानांची प्रगती केली असून तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे तर रोहितनेही दोन स्थानांनी पुढे सरकला असून तो नवव्या स्थानावर विसावला आहे. गेल्या सुमारे चार वर्षांनंतर प्रथमच टॉप टेनमध्ये चार भारतीय फलंदाजांना या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. गिलने आशिया चषक स्पर्धेत दोन अर्धशतके नोंदवत एकूण 154 धावा जमविल्या आहेत. त्याचे पाकचा बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे.
गिलने बाबर आझमच्या अगदी जवळ मजल मारली असून या दोघांत केवळ 103 गुणांचा फरक आहे. बाबरचे 863 रेटिंग गुण असून गिल 759 रेटिंग गुणासह त्याच्या मागोमाग आहे. यापूर्वी 2019 मध्ये भारताच्या तीन खेळाडूंनी टॉप टेनमध्ये स्थान मिळविले होते. जानेवारी 19 मध्ये रोहित व कोहलीसह शिखर धवनने त्यावेळी पहिल्या दहांमध्ये स्थान मिळविले होते.
पाकिस्तानने संघाने वनडे मानांकन ऑस्ट्रेलियासह संयुक्त आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांचे तीन फलंदाज टॉप टेनमध्ये आहेत. मात्र इमाम उल हक एका स्थानाने घसरण होत पाचव्या, फखर झमान तीन स्थानांची घसरण होत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजांमध्ये आशिया चषक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणारा भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने मोठी झेप घेत सातवे स्थान मिळविले आहे. त्याने या स्पर्धेत 9 बळी मिळविले आहेत. भारताचा हार्दिक पंड्या अष्टपैलूंच्या क्रमवारीत चार स्थानाने पुढे सरकत सहावे स्थान घेतले आहे.









