मध्यंतरी रशियाला प्रवास करण्याचा योग आला. लहानपणापासून या देशाबद्दलच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. राजकीय डावपेच बघितले होते. वेगवेगळ्या नृत्यांचे मासिकांमधले फोटोदेखील पाहिले होते. विविध रंगी कपडे घालणारे लोक विविध प्रकारच्या टोप्या घालणारे लोक कसे दिसत असतील? कसे बोलत असतील? अशी एक उत्सुकता मनामध्ये होतीच. या उत्सुकतेतंच तिथल्या एअरपोर्टवर उतरल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतलं ते तिथे असलेल्या एका इतिहासकाराच्या पुतळ्याने. आणि एकदम जाणवलं की जगात किर्ती रूपाने काय उरत असेल तर ती त्या देशातील कला, साहित्य, संगीत, चित्र आणि स्थापत्य. या सगळ्यांमुळे देश ओळखला जातो. देश आणि देशाची धरोहर किंवा देशाचा कणा असलेल्या या ललित कला म्हणजे देशाचं व्यक्तिमत्व ठरतं. ज्याच्या उल्लेखानेच त्या देशाची प्रतिमा तयार होत असते. आज अनेक पुढारलेले देश उच्चशिक्षित आहेत पण संस्कारहीन वाटतात. आमच्या देशात भलेही शिक्षण कमी असले तरी संस्कार जिवंत ठेवणारी चालती बोलती माणसं इथे आहेत. आज आम्ही सगळ्या जगासाठी एक आशास्थान ठरतोय तो याचाच परिपाक असावा. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तुम्हाला रामाच्या देशातले किंवा एखाद्या राजकीय नेत्याच्या देशातले म्हणून ओळखत नाहीत, तर विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, लता मंगेशकर, आर के नारायणन, सचिन तेंडुलकर यांच्या देशातून आलात का असे विचारतात. ‘कारण राज्य, राजे, नेते येतात आणि जातात, मागे उरतं ते राष्ट्र’ जे अशा कलावंतांच्या जडणघडणीतून बनलेलं असतं. असे कलाकार, अशा संस्कारांचा वारसा, अशा कला आमच्या देशात परंपरेने जपल्या जात आहेत. त्या संस्कारांचा भक्कम वारसा असलेले आपण मात्र मध्यंतरीच्या काळात राजकीय व्यक्ती पूजेमुळे या सगळ्यापासून दूर गेलो की काय असे वाटायला लागले होते. आमचाच इतिहास, वारसा, कलाकृती, वाचायचे किंवा बघायचे सोडून आम्ही परकीयांच्या झगमगटामागे धावत सुटलो होतो. कोणतीही गोष्ट परदेशात मान्य झाली की मगच तिच्याकडे आम्ही बघत होतो. आमचे शास्त्राrय संगीत, वैदिक ग्रंथ, नृत्यकला, चित्रकला, स्थापत्यकला, योगाभ्यास, आयुर्वेद जेव्हा पाश्चिमात्यांनी आपलासा केला, तेव्हा आम्हाला आता जाग यायला लागलीये. अशा सगळ्या संस्कारांना जपण्यासाठी जतन करण्याचे काम वैयक्तिक पातळीवर सुरू होतेच, पण ते संस्थात्मक पातळीवर यायला, जागतिक पातळीवर यायला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. अशा अनेक गोष्टींचा परिचय आपण या लेखन मालिकेतून करून घेणार आहोत.
(क्रमश:)








