गणेश चतुर्थी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने संपूर्ण गोव्यासह कोकण प्रांत आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यात येणारा हिंदू धर्मियांचा हा सर्वांत मोठा व अधिक लोकप्रिय सण. त्यामुळे थोरांपासून सर्वजण तेवढ्याच आतुरतेने या सणाची वाट पाहतात. चतुर्थी हा पारंपरिक सण असला तरी सार्वजनिक गणपतीमुळे त्याला सामाजिक उत्सवाचे व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. विशिष्ट धर्म व जातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकतेचा उत्सव म्हणून त्याकडे पाहिले जाते. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, पर्यावरणीय व मानवतेच्यादृष्टीनेही या सणाला वेगळे महत्त्व आहे.
हिंदू शास्त्रपुराणात सर्व गणांचा अधिपती, कला व विद्येचा अधिष्ठाता, निसर्गाचा त्राता म्हणून हे दैवत ओळखले जाते. हिंदू धर्मात कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गणपती पूजनाने करण्याची प्रथा आहे. असे असले तरी गणेशोत्सव हा संस्कृती, समाज, पर्यावरण अशा मानवी उत्थानाच्या विविध माध्यमांशी जोडला गेला आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाचा माहोल अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजेच साधारण दहा दिवस सर्वत्र व्यापून राहणार आहे. आर्थिक अंगाने पाहिल्यास चतुर्थी सण हा व्यापारी उलाढालीची मोठी बाजारपेठ बनला आहे. चतुर्थीसाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या साहित्यासह मिठाई, फळ व फुलविक्रीच्या व्यापाराने गजबजणाऱ्या बाजारपेठांतून ते दिसते. कोरोना महामारीमुळे आक्रसलेली अर्थव्यवस्था नुकतीच कुठे सावरत आहे. चतुर्थीच्या सणावर महागाईचे सावट असले तरी विघ्नहर्ता गणराय कुणालाच नाराज करीत नाही. या श्रद्धेच्या बळावरच अगदी गरीबातील गरीब माणूस उद्याची चिंता न करता अगदी बिनधास्त खरेदी करताना दिसतो. कौटुंबिक व वैयक्तिक जीवनातील अडीअडचणी व व्यथा बाजूला ठेवून प्रत्येकजण मोठ्या उत्साहात या सणाचा आनंद घेऊ शकतात, हीच त्यामागील खरी प्रेरणा म्हणावी लागेल.

भारतासह आज जगभरात पर्यावरणीय मुद्दा कळीचा बनला आहे. विविध माध्यमांतून त्याची जागृती सुरू आहे मात्र हिंदू सण-उत्सवांमागील मूळ प्रेरणाच ही निसर्गाशी निगडीत व परंपरेतून आली आहे. श्रावण महिन्यातील सर्व सण हे निसर्गपूजक आहेत. गणपती ही तर मुळात निसर्ग देवता. त्यातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित होते. वर्षा ऋतूचा उत्तरार्ध सुरु होऊन तृप्त झालेल्या सृष्टीचे खरे सौंदर्य याच काळात खुलते. भाद्रपद महिन्यात डोलायला लागणारी कणसे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करतात. निसर्गाचे हे प्रसन्न रुप जनमानसात उत्साह आणते. त्यामुळेच निसर्गाशी एकऊप साधणारा हा सण मानला जातो.
निसर्ग हा खरा कलाकार आहे. या दृष्टिकोनातून कलेच्या अंगानेही या सणाला विशेष महत्त्व लाभले आहे. गणपतीसमोरील सजावट हे मुख्य आकर्षण बनू लागल्याने कलाकारांच्या सृजनतेला हा सण वाव देतो. गोव्यात घरोघरी पुजल्या जाणाऱ्या गणपतीसमोरील फळाफुलांनी सजविली जाणारी पारंपरिक माटोळी अधिकाधिक कलात्मक होऊ लागली आहे. या पारंपरिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायती तसेच राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्यातर्फे माटोळी स्पर्धाही आयोजित केल्या जातात. सर्जनशील रांगोळ्या, प्रतिकात्मक देखावे व गणपतीचे मखरही छोट्या-मोठ्या कलाकारांसाठी सृजनाचा आविष्कार बनले आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास या उत्सवातून कलेला व्यावसायिक स्वरुप मिळते.
चतुर्थी सण परंपरेतून आला तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात विशिष्ट हेतूने झाली. इंग्रज सत्तेविरोधात देशवासियांमध्ये स्वातंत्र्याची जागृती करण्यासाठी लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यलढ्यातील अन्य विभूतींनी या सणाचे महत्त्व ओळखून त्याला सार्वजनिक स्वरुप दिले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणून एक उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय त्यांनी या सणात पाहिले व ते सफलही झाले. समाज प्रबोधन हा त्यामागील मुख्य उद्देश होता. आज गोव्यात किमान पन्नासहून अधिक सार्वजनिक गणपती आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, मुंबई या महानगरांमध्ये तर गल्लोगल्ली सार्वजनिक गणेशोत्सवांना उधाण येते. बऱ्याच मंडळांना शंभर वर्षांची परंपरा आहे. प्रबोधन व सामाजिक एकतेच्या पायावर उभी राहिलेली ही मंडळे आज दिशाहीन झालेली दिसतात. त्यामध्ये काही अपवादही असतील. भक्त मंडळाच्या आर्थिक पाठबळावर सार्वजनिक गणेशोत्सवांचा डोलारा उभा राहतो. त्यातून सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून समाजापुढे नव्याने उभे राहिलेले प्रश्न हाताळण्याची संधी या मंडळांनी घ्यावी. रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, गरीब व गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया असे अनेक विधायक उपक्रम राबविणे त्यांना सहज शक्य आहे. या मार्गानेही गणेशोत्सव मंडळांनी पाऊले टाकल्यास उत्सव अर्थपूर्ण ठरतील.
सार्वजनिक उत्सव हे समाजाच्या एकतेचे प्रतिक आहे. जाती-धर्मांमधील वितुष्टे, भेदभाव, मतभेद विसरून विविध समाजघटक एकत्र येणे, हीच त्यामागील खरी ताकद आहे. हल्ली गोव्यात धर्म व संस्कृतीच्या नावाखाली जो धार्मिक द्वेष व कलह माजविण्याचे प्रकार सुरू आहेत, त्यातून सामाजिक ध्रुवीकरणाचा वाढता धोका निर्माण झाला आहे. ही दुकाने सर्वच धर्माच्या मुखंडानी थाटलेली आहेत. धार्मिक सलोखा व शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याच्या बहुमिश्रीत संस्कृतीच्या प्रकृतीला हे मानवणारे नाही. त्याला उत्तर गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवातच सापडू शकते.
गणपतीच्या आगमनाची तयारी स्वच्छता व पावित्र्याने केली जाते मात्र उत्सव काळात प्रचंड प्रदूषण व कचऱ्याचे ढीग साठवून हे पावित्र्य भंगणार नाही, याची काळजी घेणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. ज्या पाण्यात गणपतीचे विसर्जन केले जाते, ते तलाव व नाल्यांची स्वच्छता व पावित्र्य राखणे हाही धर्मच आहे. निदान गणपती उत्सवातून तरी नागरिकांनी या गोष्टीबाबत जागरुक होऊन विधायक विचार केल्यास सण उत्सवांमागील मूळ उद्देश सफल होईल.
सदानंद सतरकर








