20 दिवसांपासून केवळ झोपलेले आहेत लोक
जगातील प्रत्येक कानाकोपरा अजब गोष्टींनी भरलेला आहे. युरोपच्या एका गावात एका स्पर्धेत लोकांना केवळ स्वत:च्या आळसाची परिसीमा दाखवून द्यावी लागते. तुम्ही हॉट डॉग खाण्याची स्पर्धा, हाय हील्समधील शर्यत, पत्नीला उचलून धावण्याची शर्यत यासारख्या स्पर्धांबद्दल ऐकले असेल. परंतु या सर्व स्पर्धा काही तासांतच संपतात. परंतु एक स्पर्धा कित्येक महिन्यांपर्यंत चालते, कारण यात निवडला जातो सर्वात आळशी व्यक्ती.

युरोपच्या उत्तर मोंटेनग्रोमधील रिसॉर्ट व्हिलेज ब्रेजनामध्ये या अजब स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा दरवर्षी आयोजित होते आणि यात सर्वात आळशी व्यक्तीचा मान मिळविण्यासाठी लोक कित्येक महिने बेडवर पडून राहतात. यावैळी देखील स्पर्धेत 20 दिवस उलटले असून 7 स्पर्धक बेडवरून हललेले नाहीत. मागील वर्षाचा 117 तासांचा विक्रम मोडीत निघाला आहे, तरीही कुणी उठण्यास तयार नाही.
जाणून घ्या नियम
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या लोकांना खाण्यापिण्याची, वाचन अन् मोबाइल-लॅपटॉप हाताळण्याची मुभा असते. परंतु त्यांना सर्व कामं बेडवरून झोपूनच करावी लागतात. स्पर्धेत उठून बसणे आणि उभे राहणे नियमांचे उल्लंघन मानले जाते. स्पर्धकांना दर 8 तासांनी 10 मिनिटांचा टॉयलेट ब्रेक दिला जातो. ही स्पर्धा मागील 12 वर्षांपासून आयोजित होत असून विजेत्याला 1,070 डॉलर्स म्हणजेच सुमारे 89 हजार रुपयांचा पुरस्कार दिला जातो.









