अपघातात जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणास आपल्या जीपमधून नेले रुग्णालयात
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले- मठ मार्गे कुडाळला जाणाऱ्या रस्त्यावर मठ पेट्रोल पंपाजवळच्या वळणावर मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारांस मोटर सायकल स्लीप होऊन जखमी होऊन विव्हळत पडलेल्या तरूणाची माहिती पोलीस निरीक्षकांना मिळताच पोलीस जीपव्दारे वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयात पोलिसांनी नेल्याने त्या तरूणाचा जीव वाचला. खाकी वर्दीतील या माणुसकीचे दर्शन या प्रसंगात जनतेला दिसून आले.
सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर यांनी या घटनेची पोलिसांना कल्पना दिली. सदर युवकाचे शरीर खरचटून अंगाला तसेच डोक्यास दुखापत झाली होती व रक्तस्त्राव होत होता. त्याबाजून ये-जा करणारे कोणीही मदतीसाठी थांबत नव्हते. अशा परीस्थितीत मठचे माजी उपसरपंच निलेश नाईक, मठ टाकयेवाडी येथील समीर आईर, वेंगुर्लेतील समीर चिंदरकर व विकी फर्नांडिस हे या घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी घटनास्थळी गेले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी तात्काळ पोलीस जीप घेऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश कुबल व हेडकॉन्स्टेबल सुरश पाटील यांना पाठविले. घटनास्थळी जाऊन मदत कार्यासाठी १०८ अँब्युलन्ससाठी संपर्क साधला असता अँब्युलन्स बाहेर गावी आहे. दुसरी अँब्युलन्स पाठविण्यात येईल पण त्यास येण्यास पाऊण तास वेळ लागेल. अशी माहिती १०८ फोन वरून मिळताच पोलीसांनी त्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी आपल्या पोलीस व्हॅनमध्ये जखमी अवस्थेतील अपघातग्रस्ताला घालून वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयात अँडमीट केले. त्यामुळे तो युवक वाचला. सदरचा युवक हा वेंगुर्लेतील सागर पवार (35) असून तो वाडीवरवडे येथील उत्तम गावडे यांच्या आंबा बागेतील कामगार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.