जळगाव / प्रतिनिधी :
‘शासन आपल्या दारी’तून अनेकांना लाभ मिळत असल्याचे पाहून काहींना पोटदुखी झाली आहे. त्यांच्या पोटदुखीवर इलाज करण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
पाचोरा येथे ‘शासन आपल्या दारी’ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अनिल पाटील आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, अडीच वर्षांच्या काळात काही लोकांनी घरी बसून सरकार चालविले. हे सरकार वरवर माहिती घेत राहिले. पण आमचे सरकार घरोघरी जाऊन माहिती घेत आहे. लोकांना लाभ देत आहे. सर्वसामान्यांसाठी आम्ही अहोरात्र काम करीत आहोत. म्हणूनच ही गर्दी होत आहे. अर्थात त्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. मात्र, त्यावरही आमच्याकडे इलाज आहे.
भारताचा ठसा जगात उमटवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देश महासत्तेकडे जात आहे, पण याची पोटदुखी काहींना का असावी? सरकार गेले. मात्र, त्यांना यावर विश्वास बसत नाही. सत्ता गेली हे ते मान्य करायला तयार नाहीत. हे दुर्दैव आहे. आता हे सामान्यांचे व गोरगरिबांचे सरकार आहे. कितीही टीका केली, तरी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. यापुढे महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम हाती घेऊन राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. ते मला म्हणावे हाऊ इज यूटी? मी म्हणालो व्हाय. त्यावर ते म्हणाले, की दरवषी ते लंडनला येतात. मोठमोठय़ा प्रॉपर्टी घेतात. मोकळी हवा खातात. तुम्ही लंडनला या. मी सगळे सांगतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नये. अन्यथा, त्यांना पाटणकर काढा घ्यायची वेळ येईल. जगभरातील लोक दिल्लीत आले. अभिमान वाटावा असा कार्यक्रम झाला. तो पाहण्याचे भाग्य लाभले. ठरावांना जगाने एकमताने मान्यता दिली. याचे खरे तर त्यांनी स्वागत करायला हवे. पण सरकार गेल्यावर त्यांच्या मनावरचा ताबा गेला आहे. पायाखालची वाळू सरकू लागली आहे, असा निशाणाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना उद्देशून लगावला.








