नौदल गलबत बांधणीचा दिवाडी बेटावर शुभारंभ : भारताचा सागरी वारसा पुनऊज्जीवित करणार
पणजी : भारताचा प्राचिन सागरी वारसा पुनऊज्जीवित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारचा उपक्रम म्हणून सुमारे दोन हजार वर्षे जुन्या तंत्र्चा वापर करून बांधण्यात येणाऱ्या जहाजाच्या (गलबत) बांधकामाचा शुभारंभ काल मंगळवारी गोव्यात दिवाडी बेटावर करण्यात आला. भारतीय नौदल आणि केंद्रीय संस्कृती मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून दिवाडी येथील होडी इनोव्हेशन्स या शिपयार्डमध्ये पेंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
भारताचा वारसा येणार जगासमोर
या उपक्रमाद्वारे भारताची प्राचीन कला जगासमोर येणार आहे. भारताला फार समृद्ध असा सागरी वारसा आणि परंपरा असून अशा जहाजांसाठी विशिष्ट लाकूड पुरविणारे राज्य म्हणून केरळची ख्याती होती. एकेकाळी भारतात जगातील सर्वात मोठी जहाजे बांधण्यात येत होती. त्यात गुजरातमधील उद्योजक आघाडीवर होते. त्यापैकीच चंदन नामक आयात-निर्यात व्यवसायातील उद्योजकाने खुद्द ’वास्को द गामा’ या दर्यावर्तीस भारताच्या वाटेवर असताना मार्गदर्शन केले होते, असे मंत्री लेखी यांनी पुढे सांगितले.
नौदल करणार सागरी परिक्रमा
भारताचा हा सागरी इतिहास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत प्राचीन तंत्राचा वापर करून सदर जहाज बांधण्यात येणार आहे. सुमारे 21 मीटर लांबीच्या या जहाजाच्या बांधकामासाठी 9 कोटी ऊपये खर्च येणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर जहाज नौदलाच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यानंतर 2025 मध्ये नौदल या बोटीवरून सागरी परिक्रमाही आयोजित करणार आहे, अशी माहिती मंत्री लेखी यांनी दिली.
‘स्टिचिंग’ तंत्रज्ञानाचा अवलंब
हा उपक्रम पंतप्रधान आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य संजीव सान्याल यांच्या कल्पनेतून साकारला असून त्यासाठी अतिप्राचीन म्हणजेच सुमारे 2 हजार वर्षे जुन्या ‘स्टिचिंग’ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. महासागरात जाणाऱ्या जहाजांच्या वांधकामासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. युरोपियन जहाजे भारतात येईपर्यंत हे तंत्रज्ञान अस्तित्वात होते. नंतर ते लोप पावले, असे सान्याल यांनी सांगितले. नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरीकुमार यांनी यावेळी बोलताना, या ऐतिहासिक प्रकल्पात सहभागी होताना खूप आनंद होत असल्याचे सांगून, भारतीय नौदलाने देशाच्या प्रचीन आणि समृद्ध सागरी परंपरेचे सदैव समर्थन केले आहे, असे सांगितले.
डिंक व तेलाचा होणार वापर
शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रथमेश दांडेकर यांनी स्वागतपर भाषणात प्रकल्पासंबंधी सखोल माहिती दिली. डिंक आणि तेलाचा वापर करून ’शिलाई’ तंत्रज्ञानाद्वारे हे जहाज बांधण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच जहाज बांधून पूर्ण झाल्यानंतर ऐतिहासिक व्यापारी मार्गाचा मागोवा घेत ते सागरी प्रवासाला निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









