बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचा इशारा
बेळगाव : गोकाक-यमकनमर्डी मतदारसंघाच्या व्याप्तीमध्ये सुरू असणाऱ्या अंकलगी, पाच्छापूर रस्त्याच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. कामाचा दर्जा ठेवून विकासकामे राबविण्यात यावी. दर्जाहीन कामे केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला. रस्ते हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. रस्त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास सोयीचे होते. यासाठी रस्त्यांचा दर्जा ठेवून विकासकाम करणे आवश्यक आहे. कामामध्ये निकृष्टता दिसून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, कंत्राटदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून दर्जा तपासणी करा. रस्त्यासाठी टाकण्यात आलेला भराव, वापरण्यात आलेली माती, याची माहिती घेतली. यासाठी रस्त्याच्या बाजूने ख•ा खणून पाहणी केली. यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. नियमानुसार रस्ताकामे राबविण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.









