शहरातील अनेक गल्ल्यांमधील समस्या : प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची गरज
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या 7 दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी आता गर्दी वाढू लागली आहे. बेळगाव परिसराबरोबरच बाहेरील राज्य व जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांमुळे कोंडीचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. त्यामुळे यासाठी आता प्रशासनाने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
शहरात अधिकतर गणपत गल्ली, माऊती गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार आदी भागात रहदारीची अधिक कोंडी निर्माण होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने आणि त्यामध्ये रिक्षावाल्यांनी बेशिस्तपणे लावलेली रिक्षा यामुळे कोंडीत अधिकच भर पडते. रिक्षाचालकांच्या बरोबरीनेच वेगवेगळ्या मार्गांवर चारचाकी वाहने थांबवून ठेवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ही थांबलेली वाहने तासन्तास उभी राहून एकंदर रहदारीला त्रासदायक ठरू लागली आहेत. हे प्रकार तातडीने थांबण्याची गरज आहे. अऊंद गल्ल्यांमध्ये पोलीस नसल्याचे पाहून वाहने उभी केली जातात. वनवे असलेल्या मार्गांवर ही समस्या मोठ्या प्रमाणात घडू लागली आहे. रामदेव गल्लीतून केळकरबागकडे जाणारा संपर्क रस्ता हे त्याचे सर्वात जवळचे उदाहरण आहे. रहदारी पोलीस चुकीच्या पद्धतीने लावलेल्या दुचाकींवर कारवाई करतात. मात्र त्यामध्ये सातत्याचा अभाव दिसून येऊ लागला आहे. मध्यवर्ती शहरात चुकीच्या बाजूला किंवा चुकीच्या पद्धतीने पार्किंग झाले असल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस दुचाकी उचलून पोलीस स्थानकाकडे घेऊन जातात. किंवा चारचाकी चुकीच्या पद्धतीने लावली गेल्यास त्याला कुलूप लावून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई नित्यनेमाने करण्याच्या दृष्टीने रहदारी पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडू लागले आहे.
तातडीने तोडगा काढावा
कलमठ रोड, नरगुंदकर भावे चौक, रविवार पेठ, मेणसी गल्ली आदी परिसरात अद्यापही अवजड वाहने घुसडण्याचे प्रकार सुरूच आहेत. काही ठिकाणी रस्ते निर्मितीची कामे सुरू असतानाही अवजड वाहने घुसडली जात असून याचा फटका लहान सहान वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे. गणेशोत्सवात स्थानिक बेळगावकरांच्या बरोबरीनेच आसपासच्या खानापूर आणि बेळगाव तालुक्मयातील नागरिकांची गर्दी मोठी असते. खरेदी आणि गणेश दर्शन या दोन्ही उद्देशांनी येणाऱ्यांमध्ये नजीकचेच चंदगड व गडहिंग्लज तालुके तसेच गोव्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात बेळगावात येतात. त्यांची वाढीव संख्या लक्षात घेऊन सुटसुटीत रहदारी यंत्रणा ठेवण्यासाठी तातडीने तोडगा काढला जावा, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.









