बाजारपेठ स्वागतासाठी बहरली : भक्तांना गणेशोत्सवाची उत्कंठा : आकर्षक साहित्याने भक्तांचे मन वेधले : खरेदीला वेग, नागरिकांची लगबग
बेळगाव : गणेश चतुर्थी अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने लाडक्या बाप्पांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी बाजारात वैविध्यपूर्ण सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे बाजारपेठही स्वागतासाठी बहरलेली दिसत आहे. बाजारपेठेत विविध प्रकारच्या लायटिंग माळा, गणरायासाठी शाल, टोपी, हार, पेटे, विविध प्रकारचे दागिने, पेपर, फ्लॉवर पॉट, फुगे, आकर्षक डेकोरेशनचे मंडप, विविध प्रकारची छपाई केलेले पडदे, साधे पडदे, थर्माकोलची मंदिरे यासह इतर आकर्षक साहित्य भक्तांचे मन वेधून घेत आहेत. शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मेणसी गल्ली आदी ठिकाणी त्यांची विक्री होऊ लागली आहे.
येत्या मंगळवारी गणेश चतुर्थी असल्याने बाप्पांचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी भक्तांची धावपळ सुरू झाली आहे. गणरायांच्या स्वागतासाठी विविध साहित्य खरेदीलाही वेग येऊ लागला आहे. त्यामुळे बाजारात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. बाजारात यंदा तयार पडद्याचे मंडप भक्तांचे लक्ष वेधू लागले आहेत. साधारण 4×4 फूट आकाराचा मंडप 1800 रुपयांपर्यंत आहे. शाल 80 ते 150 रु., टोप्या 10 ते 30 रु., हार 60 ते 1500 रु., गणेशासाठी आकर्षक फेटे 75 ते 500 रु., थर्माकोल मंदिर 500 ते 5000 रु., किरीट 60 ते 300 रु., ताव पेपर 5 ते 25 रु. यासह विविध प्रकारचे प्लास्टिक हार, फुले आणि माळा विक्री होऊ लागल्या आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या किमती भरमसाट वाढू लागल्या आहेत. कडधान्य, तूरडाळ, साखर, तेल आदी वस्तुंच्या किमतीत वाढ झाली आहे. सजावटीच्या किमतीतही काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे भक्तांना वाढत्या महागाईला तोंड देत गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.
रेडिमेड साहित्य मागणी वाढ
बाजारात घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी खरेदी सुरू झाली आहे. विशेषत: पांगुळ गल्लीत नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळत आहे. सजावट साहित्याच्या विविध आकारानुसार किमती ठरल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे खरेदीसाठी बाजारात येत आहेत. अलीकडे गणेशोत्सवासाठी रेडिमेड साहित्याची मागणी वाढल्याने बाजारात उलाढाल वाढू लागली आहे.
साहित्य दरात 10 टक्के वाढ
बाजारात विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे. नवीन मोती हार आणि विविध व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गतवर्षीपेक्षा सजावटीच्या साहित्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, मागणीही समाधानकारक आहे.
– संजय तेवरे (सजावट साहित्य विक्रेते)









