माईलस्टोन गाठणारा भारताचा सहावा फलंदाज
वृत्तसंस्था/ कोलंबो
भारतीय कर्णधार रोहित शर्मा मंगळवारी वनडे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारा भारताचा सहावा व विश्वातील 15 वा फलंदाज बनला आहे.
लकेविरुद्धच्या आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर फेरीच्या सामन्यातील सातव्या षटकात त्याने हा माईलस्टोन गाठला. त्याने कसुन रजिथाला षटकार ठोकत हा टप्पा गाठला. त्याने 241 डावांत हा टप्पा गाठला असून कमी डावात हा माईलस्टोन गाठणारा कोहलीनंतरचा दुसरा फलंदाज आहे. कोहलीने हा टप्पा 205 डावांत गाठला होता. या दसहजारी क्लबमध्ये भारताच्या अन्य खेळाडूंत सचिन तेंडुलकर (18426), विराट कोहली (13026), सौरभ गांगुली (11363), राहुल द्रविड (10889) व एमएस धोनी (10773) यांचा समावेश आहे.
रोहित हा वनडेमध्ये तीन द्विशतके नोंदवणारा एकमेव फलंदाज आहे. याशिवाय डावात सर्वाधिक धावा नोंदवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने लंकेविरुद्ध 2014 मध्ये ईडन गार्डन्सवर 264 धावा झोडपल्या होत्या. त्याने पहिले द्विशतक 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवल्यानंतर 2017 मध्ये लंकेविरुद्ध मोहालीतील सामन्यात नाबाद 208 धावा फटकावल्या होत्या. वनडेमध्ये त्याची रिकी पाँटिंगइतकीच 30 शतके झाली असून सर्वाधिक षटकार नोंदवणाऱ्या फलंदाजांत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.









