वृत्तसंस्था / चेन्नई
सनातन धर्मावर वादग्रस्त विधान करुन लोकांच्या रोषाला कारणीभूत झालेले द्रमुक पक्षाचे नेते ए. राजा यांनी पुन्हा एकदा आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी हिंदू धर्माला लक्ष्य केले असून हा धर्म केवळ भारतासाठी नव्हे, तर साऱ्या जगासाठी संकट आहे, असे विधान केले आहे.
त्यांच्या या विधानाचे व्हिडीओ चित्रण तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी प्रसिद्ध केले आहे. या चित्रणात राजा हिंदू धर्मासंबंधी मुक्ताफळे उधळताना आढळून येतात. अण्णामलाई यांनी हा व्हिडीओ ‘एक्स’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेला आहे. हिंदू धर्मात जातीव्यवस्था आहे. त्यामुळे हा धर्म जगासाठी संकट आहे, असे विधान राजा यांनी केलेले या व्हिडीओत दिसून येते. तथापि, अण्णामलाई यांनी या विधानावर खोचक टिप्पणी केली आहे. ‘द्रमुक’ हा पक्ष तामिळनाडूत जातीभेद आणि विद्वेष पसरविणारे महासंकट आहे’ अशी टिप्पणी करत त्यांनी द्रमुकला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
तामिळनाडूत सध्या अण्णामलाई यांची राज्यव्यापी पदयात्रा होत आहे. या यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो. यामुळे द्रमुक नेते सैरभैर झाले असून त्यांना भाजप आपल्यासमोर आव्हान उभे करेल अशी धास्ती वाटते. म्हणून त्यांना सनातन किंवा हिंदू धर्मावर अश्लाघ्य भाषेत अवमानजनक विधाने करण्यास प्रारंभ केला आहे, असेही बोलले जात आहे.









