वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेच्या नूतन आणि भव्य वास्तूत प्रथम अधिवेशन गणेशचतुर्थीच्या शुभमूहूर्तावर 19 सप्टेंबरला होणार आहे. या नूतन संसदभवनातील कर्मचाऱ्यांचा गणवेशही नवा असेल. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना हा नवा गणवेश पुरविला आहे. तो लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांसाठी असेल.
फिक्कट पिवळ्या रंगाचे जाकीट, फिक्कट पिवळ्या रंगाचा सदरा, सदऱ्यावर गुलाबी रंगातील कमळाचे चित्र आणि खाकी रंगाची ट्राऊझर असा हा नवा गणवेश आहे. तो दोन्ही सदनातील कर्मचाऱ्यांसाठी समान आहे. 6 सप्टेंबरलाच तो सर्व कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आला आहे. सर्व अधिकाऱ्यांचा गणवेशही त्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती संसदेच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
पाच दिवस विशेष अधिवेशन
संसदेचे विशेष अधिवेशन 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत होणार आहे. या अधिवेशनाच्या प्रथम दिनी ते जुन्या संसदभवनात घेतले जाईल. त्या दिवशी या जुन्या वास्तूला निरोप देण्यात येईल. त्यानंतर 19 सप्टेंबरपासून अधिवेशन नव्या संसदभवनात आयोजित करण्यात आले आहे. त्यानंरचे प्रत्येक अधिवेशन नव्या वास्तूतच घेण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.









