8 महिन्यांपासून होता फरार : दोन जणांना जिवंत जाळल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ गुरुग्राम
हरियाणा पोलिसांनी मोनू मानेसरला मंगळवारी अटक केली आहे. मोनू मानेसरवर भिवानी येथे नासिर अन् जुनैद या दोघांना जिवंत जाळल्याचा आरोप आहे. मोनूला राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे. मोनू हा मागील 8 महिन्यांपासून फरार होता. त्याला त्याच्याच गावातून ताब्यात घेण्यात आले आहे.
16 फेब्रुवारी रोजी हरियाणाच्या भिवानीमध्ये बोलेरो गाडीत दोन जळालेले मृतदेह आढळून आले होते. हे मृतदेह राजस्थानमधील जुनैद आणि नासिरचे असल्याचे तपासात आढळून आले होते. हरियाणाच्या अनेक गोरक्षकांवर त्यांच्या हत्येचा आरोप झाला होता. यातील सर्वात चर्चित नाव मोनू मानेसर उर्फ मोहित यादवचे होते.
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील घाटमीका गावचे रहिवासी नासिर (28 वर्षे) आणि जुनैद (33 वर्षे) यांचे 15 फेब्रुवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी हरियाणाच्या भिवानी येथे दोघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी दोघांच्या कुटुंबीयांनी कथित गोरक्षक मोनू मानेसर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हत्येचा आरोप केला होता. याप्रकरणी भरतपूर पोलिसांनी मोनू मानेसर समवेत अन्य काही जणांविरोधात गुन्हे नोंदविले होते. पोलिसांनी याप्रकरणी फरार 8 आरोपींची छायाचित्रेही जारी केली आहेत.









