मथुरा कॉरिडॉरच्या कामास सुरुवात होणार
वृत्तसंस्था/ मथुरा
काशी, अयोध्येनंतर आता मथुरेत 505 कोटी रुपयांच्या निधीद्वारे भव्य कॉरिडॉर निर्माण करण्याची तयारी सुरू झाली आहे. ब्रज तीर्थ विकास परिषदेने कार्ययोजनेची विस्तृत रुपरेषा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर सादर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात काही सुधारणा सुचविल्या आहेत. सुधारित कार्ययोजना लवकरच अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. न्यायालयाची मंजुरी मिळाल्यावर चालू वर्षी कॉरिडॉरची निमिर्ती सुरू व्हावी असा योगी सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात 18 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मागील वर्षी जन्माष्टमीवेळी मथुरेत चेंगराचेंगरीमुळे 2 भाविकांना जीव गमवावा लागला होता. यानंतर एका याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कॉरिडॉर निर्मितीची योजना सादर करण्याचा निर्देश दिला होता. 22,800 चौरस मीटरमध्ये प्रस्तावित या कॉरिडॉरमुळे बांके बिहारीचे दर्शन घेण्यास कमी वेळ लागणार आहे. तसेच गर्दीचे व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या एकावेळी केवळ 800 भाविकांनाच दर्शन करता येते. कॉरिडॉर निर्माण झाल्यावर ही क्षमता वाढून 5 हजार होणार आहे.
राज्यात 2022-23 मध्ये वाराणसीनंतर सर्वाधिक 6.52 कोटी धार्मिक पर्यटकांनी मथुरेला भेट दिली होती. साधारण दिवसांमध्ये प्रतितास 2600 तर दिवसभरात 15 हजार भाविक येथील मंदिरात पोहोचतात. तर सणासुदीच्या काळात दररोज 50 हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. अरुंद रस्ते, वास्तव्य अ्न प्रसाधन सुविधांच्या अभावामुळे तेथे भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते.
भगवान बांके बिहारी यांचे वर्तमान मंदिर 1826 मध्ये स्थापित करण्यात आले होते. त्यावेळी मंदिर अत्यंत छोटे होते. कालौघात एका भव्य मंदिराची गरज जाणवल्यावर मंदिराच्या पुजाऱ्यांनी निधी जमविण्यास सुरुवात केली, 1868 मध्ये सध्या असलेले मंदिर निर्माण करण्यात आले होते. त्यावेळी या मंदिराकरता 70 हजार इतका खर्च आला होता.
बांके बिहारी मंदिर 4 भागांमध्ये असून यात गर्भगृह, जगमोहन, पटांगण आणि भांडार आहे. जगमोहन आणि पटांगणात उभे राहून भाविक देवाचे दर्शन घेतात. पटांगण सुमारे 2300 फूटांचे असून मागील हिस्सा 600 फुटांमध्ये तयार करण्यात आला आहे. याचबरोबर एक अर्धनिर्मित हॉल देखील मंदिर परिसरात आहे.
कॅ









