सर्बियाचा प्रतिभावान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत 24 व्या ग्रँडस्लॅम पदकावर उमटविलेली मोहोर ऐतिहासिकच म्हटली पाहिजे. या विजेतेपदाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाच्या महान टेनिसपटू मार्गारेट कोर्ट यांच्या सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम जेतेपदांशी (पुऊष व महिला मिळून) जोकोविचने साधलेली बरोबरी हा मैलाचा दगडच ठरावा. टेनिस, क्रिकेट असो वा आणखी कोणताही खेळ. यातील विक्रमांना एक आगळे महत्त्व आहे. विक्रम हे तोडण्यासाठीच असतात, असेही म्हटले जाते. तथापि, काही विक्रम हे प्रदीर्घ काळ राहतात. त्यांना स्पर्श करणे वा ओलांडणे, हे अतर्क्य मानले जाते. जोकोविचचा नवा विक्रमही त्याच पठडीतील म्हणता येईल. मागची दीड ते दोन दशके पुऊषांच्या टेनिसवर प्रामुख्याने रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच या त्रिमूर्तींचे वर्चस्व राहिलेले आहे. या तिन्ही टेनिसपटूंनी आपल्या सहजसुंदर खेळाद्वारे टेनिसला समृद्ध करण्याचे काम केले. तिघांचीही शक्तीस्थळे वेगळी असली, तरी सातत्य, खेळाप्रतीची निष्ठा हा तिघांमधीलही समान दुवा राहिलेला आहे. अर्थात तंदुऊस्तीच्या पातळीवर जोकोविच हा अधिक सरस असल्याचे वेळोवेळी पहायला मिळते. त्या बळावरच त्याने आज ही मजल मारली आहे. फेडरर व नदालच्या नावावर अनुक्रमे 20 व 22 पदके आहेत. तर जोकोविचने 24 पदकांसह या शर्यतीत आघाडी घेतल्याचे दिसून येते. फेडररने टेनिसला निरोप दिला आहे. तर तंदुऊस्तीच्या प्रश्नांमुळे नदालही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. दुसऱ्या बाजूला 36 वर्षी जोकोविचचा खेळ मात्र दिवसेंदिवस फुलताना दिसतो. त्यामुळेच त्याचा विक्रम नजिकच्या काळात कुणाला तोडता येईल का, याबाबत साशंकताच वाटते. माझे शरीर मला चांगले साथ देत असून, मी अजूनही ग्रँडस्लॅममध्ये खेळू शकतो नि विजयही मिळवू शकतो. सर्वोच्च शिखरावर असताना मला हा खेळ सोडायचा नाही, ही त्याची प्रतिक्रिया त्याची भविष्यातील दिशाच दर्शविते. महिला व पुऊषांच्या टेनिसचा विचार करता स्टेफी ग्राफ, सेरेना विल्यम 23, तर मार्गारेट कोर्टच्या नावावर 24 अजिंक्यपदकांची नोंद आहे. अगदी विक्रमाच्या उंबरठ्यावर असतानाही सेरेनाला कोर्टच्या विक्रमाची बरोबरी करता आली नाही किंवा नवा विक्रम करण्याची संधीही साधता आली नाही. जोकोविचने मात्र हे करून दाखविले. त्याच्या प्रतिक्रियेतून आणखी पदके मिळविण्याची त्याची भूकच अधोरेखित होते. हे पाहता त्याच्या खात्यात आणखी काही पदकांची नोंद झाली, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. या महान खेळाडूच्या एकूणच कामगिरीचा विचार केला, तर ती चतुरस्रच ठरावी. अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन त्याच्याकरिता अधिक खास म्हटली पाहिजे. या स्पर्धेत तब्बल 10 पदके मिळवित त्याने आपला दबदबा दाखवून दिला आहे. याशिवाय फ्रेंच ओपनमध्ये 3, विम्बल्डनमध्ये 7, तर अमेरिकेन ओपनमध्ये 4 जेतेपदांना गवसणी घालत त्याने आपला दर्जा सिद्ध केल्याचे पहायला मिळते. विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझने त्याला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे नोवाक युगाला उतरती कळा लागणार का, अशा शंका टेनिसप्रेमींच्या मनात उत्पन्न झाल्या होत्या. मात्र, मेदवेदेवसारख्या कसलेल्या खेळाडूला अस्मान दाखवित नोवाकने आपला जोश कायम असल्याचीच प्रचिती दिली आहे. स्वाभाविकच टेनिसमधील उगवत्या सिताऱ्यांना या विक्रमादित्याशी यापुढेही दोन हात करावे लागतील. टेनिस हा अत्यंत आगळावेगळा क्रीडाप्रकार आहे. पदलालित्य, जोम, चापल्याबरोबरच तुमच्या भात्यात विविध अस्त्रे असणेही आवश्यक असते. जोकोविच यात कुठेही कमी पडत नाही. त्याची स्वत:ची म्हणून एक शैली आहे. खेळात एकप्रकारची नजाकत आहे. त्याला एकाग्रता व चपळतेची जोड लाभल्यानेच आज हा टेनिसपटू या स्थानावर पोहोचला आहे. यातून एक नवा इतिहासच या खेळाडूने निर्माण केला आहे. आता येथून पुढे त्याचे प्रत्येक पाऊल हा एक नवा विक्रम असेल. त्याचे साक्षीदार होण्यासाठी टेनिसपटू नक्कीच उत्सुक असतील. सातत्य, दर्जा व तंदुऊस्ती या त्याच्या विशेषातून नव्या पिढीस कायम प्रेरणाच मिळेल. महिलांच्या टेनिस स्पर्धेत 19 वर्षीय कोको गॉफने बेलाऊसच्या अर्यना सबलेन्काचे आव्हान परतवून पटकावलेले पहिलेवहिले विजेतेपदही विशेष होय. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेली ही टेनिसपटू अंतिम सामन्यात जिंकणार नाही, अशाच स्वऊपाच्या प्रतिक्रियांची राळ सोशल मीडियावर उडाली होती. त्या वाचून एखाद्या खेळाडूच्या मनात नकारात्मकता निर्माण होणे तसे स्वाभाविकच. तथापि, चांगला खेळ करीत गॉफने त्याचे सकारात्मकतेत केलेले ऊपांतर लक्षवेधक ठरते. या जेतेपदाद्वारे गॉफ ही सर्वांत कमी वयात ग्रँड स्लॅम जिंकणारी अमेरिकन टेनिसपटू ठरली आहे. यंदाच्या विम्बल्डनमध्ये तिला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर 19 पैकी 18 लढती जिंकत तिने नवा पराक्रम केला. यापैकी 12 लढती या तिने सलग जिंकल्या आहेत. तिचा हा परफॉर्मन्स कुणासाठीही प्रेरणादायी ठरावा. मागच्या काही वर्षांत महिला टेनिसमध्ये कुणा एका खेळाडूला आपले वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. विल्यम्स भगिनींचे युग संपल्यानंतर कोणत्याही टेनिसपटूस सातत्य दाखविता आलेले नाही. त्यामुळे गॉफपुढेही सातत्य राखण्याचे आव्हान असेल. 19 व्या वर्षी चँपियनशीप मिळवून तिनेही नवा विक्रम निर्माण करीत अपेक्षा वाढविल्या आहेत. तिचा खेळ चांगलाच आहे. त्याचबरोबर वयही तिच्या बाजूने आहे. त्यामुळे भविष्यात ही खेळाडू कुठवर मजल मारणार, याबाबत टेनिसप्रेमींमध्ये उत्सुकता असेल. आजवर टेनिसने अनेक दर्जेदार खेळाडू व त्यांचा खेळ पाहिला. या उच्चप्रतीच्या खेळाने टेनिसप्रेमींना नेहमीच आनंद दिला. विक्रम होतच असतात. परंतु, खेळातील आनंद अधिक महत्त्वाचा असतो.








