वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर आता प्रत्येक क्षेत्रात जोमाने होत आहे. त्यामध्ये आता रेल्वे मागे कशी राहणार? एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक कामे सहज केली जात आहेत. रेल्वे प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन नवीन तंत्रज्ञानासह नवीन सेवा आणि सुविधा सादर करत असते. यामध्ये आता प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वे कृत्रिम बुद्धिमत्ता (भारतीय रेल्वे एआय डिव्हाइस) चा अवलंब करत आहे.
रेल्वे चालकांवर लक्ष
रेल्वे चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञान वापरले जात आहे. हे उपकरण ड्रायव्हरला डोळे मिचकावल्यावर अलर्ट करेल. यासोबतच ट्रेनलाही थांबविता येणार आहे. रेल्वे चालकाला झोप लागल्यास हे उपकरण आपत्कालीन ब्रेक लावणार आहे. यामुळे मोठे अपघात टाळता येणार असल्याचेही सांगितले आहे.
रेल्वे ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम
एआय उपकरण बनवण्यासाठी जूनपासून चर्चा सुरू आहे. ज्याला रेल्वे ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (आरडीएएस) असे नाव दिले जाऊ शकते. अजूनही त्यावर काम सुरु आहे. त्यानंतर त्याची पूर्ण चाचणी करण्यात येणार आहे. आगामी काही आठवड्यांत ते पूर्ण होणार असल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रथम ते 20 मालवाहू लोकोमोटिव्ह आणि काही प्रवासी लोकोमोटिव्हकरीता वापरले जाईल.









