शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे वेंगुर्ले शहर शिवसेनेची मागणी
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले शहर व उभादांडा या भागातील नागरिकांनी दोन्ही गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिवसेनेकडे, वेंगुर्ले मांडवी ते नवाबाग रस्ता पुल व्हावा अशा केलेल्या मागणीचे निवेदन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन वेंगुर्ले शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सादर केले.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे नागरिकांनी केलेल्या मागणीबाबत वेंगुर्ले शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम यांनी सादर केलेल्या निवेदनात, वेंगुर्ले शहर पर्यटनदृष्ट्या विकसीत होत आहे. त्यासाठी आपण वेंगुर्ले शहरातील अनेक पर्यटन कामांना देत असलेल्या निधीमुळे हे शक्य होत आहे. आपण झुलत्या पुलासाठी केलेले प्रयत्न करून ते पुर्णत्वास नेलेले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणांत असते. तसेच बंदर, लाईट हाऊस व सागर बंगला आणि समुद्राच्या लाटांचा आनंद लुटण्यास मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. वेंगुर्ला शहर व उभादांडा-नवाबाग या गावातील अनेक जेष्ठ नागरिकांतून ,महिलांमधून व मच्छीमार व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक यांचेकडून वेंगुर्ले शहर मांडवी ते उभादांडा – नवाबाग जोडणारा पुल बांधला गेल्यास त्याचा फायदा लहानमुले, महिला, जेष्ठ नागरीक यांसह पर्यटक, स्थानिक बेरोजगार युवक-युवतींना आणि मच्छिमार व्यावसायिकांना होणारा आहे. नवाबाग येथे मत्स्यजेटी आहे. पण तेथून मच्छिमार्केटमध्ये येण्यास अंतर लांब असल्याने रस्त्याने मच्छिमारांस मासे बाजारात आणण्यास उशीर होतो. जर वेंगुर्ले शहर मांडवी ते उभादांडा-नवाबाग जोडणारा पुल झाला तर १० मिनीटांत ताजी मच्छि बाजारात येईल. त्याला भावही चांगला मिळून स्थानिक मच्छिमारांचा फायदा होऊ शकतो. तसेच वेंगुर्ले शहर मांडवी ते उभादांडा-नवाबाग जोडणारा पुल झाल्यास आपण नवाबाग येथे होऊ घातलेला फिशरमन व्हीलेज प्रकल्प सुध्दा यशस्वी होणार आहे. तसेच मांडवी खाडी किनारी महिला कांदवळवन सफारी प्रकल्प असल्याने रस्ता झाल्यास येथे पर्यटन वाढेल. त्यामुळे या भागात महिलांनी पर्यटन दृष्ट्या चालू केलेल्या निवास न्याहारी योजनाही चालू शकतात. त्यामुळे त्यांचा फायदा होऊ शकतो.
वेंगुर्ले शहर व उभादांडा हे दोन गाव लगतचे असल्याने व त्यांच्याशी मैत्रीचे नाते अधिक दृढ करणारा असा वेंगुर्ले शहर मांडवी ते उभादांडा-नवाबाग जोडणारा रस्ता विकासाचा प्रमुख दुवा ठरणारा आहे. मांडवी ते नवाबाग या दोन्ही मधील अंतर सुमारे ३० ते ४० मीटर एवढे असून पर्यटन व मच्छिमारांचा विकास साधण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक तो निधी मंजूर करून हे विकास काम करावे. या कामाची नोंद झुलत्या पुलाप्रमाणे वेंगुर्ले वासियांत व मच्छीमारांत कायम स्वरूपी राहिल.
सदर विकासकाम तातडीने होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. अशी मागणी करणारे लेखी निवेदन वेंगुर्ले शहरातील व उभादांडा-नवाबाग येथील नागरिकांतून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना देण्यासाठी वेंगुर्ला शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांच्याकडे देण्यात आले होते. सदरचे लेखी निवेदन आज रविवारी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची वेंगुर्ले शहर व तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भेट घेऊन उमेश येरम यांनी सादर केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, बाळा दळवी, युवा सेना शहर प्रमुख संतोष परब, महिला शहर प्रमुख अँड. श्रद्धा बावीस्कर-परब, उप जिल्हा प्रमुख सुनील डुबळे, अल्पसंख्याक महिला शहर शाखा प्रमुख शबाना शेख, शाखा प्रमुख सौ. मनाली परब यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









