निजामुद्दिन एक्स्प्रेसमधील घटना : लुटीचा प्रयत्न असल्याचा संशय
बेळगाव : हजरत निजामुद्दिन एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणारे आठ प्रवासी रेल्वेत गुंगीत आढळले आहेत. गुंगीचे औषध देऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय आहे. सोमवारी रात्री उघडकीस आलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली असून रेल्वेप्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गोव्यातील कुळे रेल्वेस्थानकाजवळ हा प्रकार रेल्वेसुरक्षा दलाच्या अधिकारी व जवानांच्या लक्षात आला. त्यांनी या प्रवाशांना बेळगावपर्यंत आणले. रात्री 8.20 वाजण्याच्या सुमारास निजामुद्दिन एक्स्प्रेस बेळगाव रेल्वेस्थानकावर पोहोचली. जनरल बोगीत प्रवासी बेशुद्ध झाल्याचे समजताच रेल्वे प्रशासन, आरपीएफ, रेल्वे पोलिसांची धावपळ उडाली.
बेशुद्ध प्रवाशांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल
बेळगाव रेल्वेस्थानकावर बेशुद्ध प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. रुग्णवाहिकेतून रात्री त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. हे प्रवासी 20 ते 25 वयोगटातील असून कोणीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. प्रचंड गुंगीत असल्याने त्यांच्याकडून कसलीच माहिती मिळाली नाही. रात्री उशिरापर्यंत या घटनेसंबंधी माहिती मिळविण्याचे काम रेल्वे पोलिसांनी हाती घेतले होते. बिस्कीट, शीतपेय व चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार रेल्वेत वारंवार घडत असतात. असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वेसुरक्षा दल व रेल्वे पोलीस प्रत्येक रेल्वेत गस्त घालत असतात. प्रवाशांमध्ये जागृतीही करण्यात येते. अनोळखी व्यक्तींकडून दिले जाणारे कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असे वारंवार सांगितले जाते. तरीही अशा घटना घडतात. सोमवारी रात्री प्रचंड गुंगीत आढळून आलेले आठही तरुण हिंदी भाषिक असल्याचे समजते. रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश व त्यांचे सहकारी सहप्रवाशांकडून या तरुणांविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. या आठ जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ते शुद्धीवर आल्यानंतरच त्यांची ही अवस्था होण्यामागे काय कारण आहे, हे समजणार आहे.









