67 कोटी 25 लाख 38 हजारांची देवाण घेवाण
बेळगाव : लोकअदालतीमध्ये खटले निकालात काढण्यासाठी कायदा सेवा प्राधिकार नेहमीच प्रयत्न करत असते. शनिवार दि. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 22 हजार 617 खटले निकालात काढले गेले आहेत. एकूण 67 कोटी 25 लाख 38 हजार 260 रुपयांची देव-घेव झाली आहे. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. विजयालक्ष्मीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे खटले निकालात काढले गेले आहेत. बेळगाव येथील न्यायालयाबरोबरच तालुक्यातील विविध न्यायालयांमध्ये खटले निकालात काढण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांनी प्रयत्न केले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला आहे. या लोकअदालतीमध्ये 54 फौजदारी खटले, चेकबॉन्स 631, बँकवसुली 39, अपघातातील विमा खटले 223, विद्युत प्रकरणे 90, कौटुंबिक 21, इतर 1343 आणि 1378 दावे व इतर खटले असे एकूण 22 हजार 617 खटले निकालात काढले गेले आहेत, अशी माहिती जिल्हा कायदा सेवा प्राधिकारच्यावतीने देण्यात आली. विशेषकरून अपघात विम्यामधील 223 खटले निकालात काढण्यात आले असून 13 कोटी रुपये संबंधित कुटुंबीयांना देण्यात आले आहेत.
जनतेचा उत्तम प्रतिसाद
जिल्ह्यातील सर्वच न्यायालयांमध्ये ही लोकअदालत भरविण्यात आली आहे. त्याला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. वकिलांनीही सहकार्य केले असून त्यामुळेच हे खटले निकालात काढले गेले आहेत, असे सांगण्यात आले.
21 जणांची मने पुन्हा जुळविली
कौटुंबिक न्यायालयामध्ये किरकोळ कारणातून खटले दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. गैरसमजातून तसेच अफवांमधून अनेकांची मने तुटली होती. मात्र कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पुन्हा त्या दाम्पत्यांची मने जुळविण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आले. बेळगाव येथील दोन न्यायालयांमध्ये 13 तर तालुक्यातील 8 दाम्पत्यांची मने पुन्हा एकदा जुळली असून त्यांना पुढील संसार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
पंधरा वर्षांपासूनचे खटले निकालात
शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये, असे म्हटले जाते. न्यायालयात गेल्यानंतर खटले प्रलंबित राहतात. त्यामुळे न्यायालयात जाण्याचे काही जण टाळतात. आपल्यावर झालेला अन्याय सहन करतात. 15 वर्षांपासून काही खटले प्रलंबित होते. मात्र ते खटलेही या लोकअदालतीमध्ये निकालात काढले गेले आहेत. एकूणच लोकअदालतीच्या माध्यमातून तातडीने न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला यश देखील मिळू लागले आहे.









